भाजपला धारिष्टय़ दाखविण्याचे आव्हान
ठाणे, नांदेड आणि गोव्यातील बॉम्बस्फोटांत सनातन संस्थेचा हात असल्याचे निष्पन्न झाले आहे. कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक झालेला आरोपी हा सनातन संस्थेचा कार्यकर्ता असल्याचे सिद्ध झाले आहे. यामुळेच या संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात कारवाई करण्याबरोबरच या संस्थेवर बंदी घालण्याची मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केली आहे.
ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी न्यायालयाने सनातन संस्थेच्या दोघांना दहा वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. गोव्यातील चर्चसमोर झालेल्या बॉम्बस्फोटात याच संघटनेचा हात होता. कॉ. पानसरे यांच्या हत्येत याच संघटनेच्या कार्यकर्त्यांला अटक झाली. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. पानसरे आणि कर्नाटकातील एम. एम. कलबुर्गी या तीन पुरोगामी चळवळीतील विचारवंतांची प्रतिगामी मंडळींनी हत्या घडवून आणली, हा आरोप खरा ठरला आहे. समाजविघातक काम करणाऱ्या सनातनवर लगेचच बंदी घातली जावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
‘भारताचा पाकिस्तान करायचा नसल्यास सनातन संस्थेवर बंदी घालण्यात यावी,’ असे मत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले. काँग्रेस सरकारने ‘सिमी’ या जातीयवादी संघटनेवर बंदी घातली होती. आता भाजप सरकारने सनातनवर बंदी घालण्याचे धारिष्टय़ दाखवावे, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे.
समीरच्या घराला पोलिसांचा वेढा
कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या समीर विष्णू गायकवाड याच्या हालचालींवर गेल्या सहा महिन्यांपासून पोलिसांनी लक्ष केंद्रित केले होते. त्याच्या संशयास्पद हालचालींवरून त्याला बुधवारी पहाटे पोलिसांनी अटक केली. समीर याच्या अटकेनंतर सांगलीच्या १०० फुटी रोडवर असलेल्या मोती चौकातील घराला पोलिसांनी वेढा दिला. बुधवारी सकाळपासून पोलीस या परिसराची कसून तपासणी करीत आहेत. उप अधीक्षक प्रकाश गायकवाड आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट हे समीर यांच्या दैनंदिन हालचालींची माहिती घेण्याचा प्रयत्न करीत होते.
अटक करण्यात आलेल्या समीरचे संपूर्ण कुटुंब आई, दोन मावशा आणि पत्नी या सनातन कार्यकर्त्यां होत्या. त्याचे आजोळ कर्नाटकातील संकेश्वर येथे आहे. एक भाऊ, भावजय आणि आईसह तो सांगलीत राहण्यास होता.
मडगाव बॉम्बस्फोटावेळीही चौकशी
मडगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोटात त्याची चौकशीही झाली होती. मात्र, चौकशी पथकाला त्याचा प्रत्यक्ष सहभाग आढळून आला नव्हता. त्याच्या चौकशीनंतर त्याचे मोबाइल दुरुस्तीचे दुकान बंद करण्यात आले. त्यानंतर त्याने मुंबईतही काही काळ वास्तव्य करून व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला होता. समीर हा सनातनचा पूर्ण वेळ कार्यकर्ता असल्याने त्याची फिरती सुरू असायची. त्याची पत्नीही सनातनची पूर्णवेळ कार्यकर्ती असून ती सनातनाचा गोव्यातील रामनाथी आश्रमात सेवेस असल्याची माहिती मिळाली.

‘सनातन द्वेष्टय़ांच्या दबावाला बळी पडून कारवाई
समीरला गोवल्याचा ‘सनातन’चा आरोप
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला समीर गायकवाड हा निष्पाप असून, त्याला या प्रकरणी गोवण्याचा पोलिसांचा बनाव असल्याचे पत्रक सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त वीरेंद्र मराठे यांनी प्रसिद्धीस दिले आहे. सनातन द्वेष्टय़ांच्या दबावाला बळी पडून पोलिसांनी हा बनाव केला असल्याचे पत्रकात म्हटले आहे.
पोलिसांनी २ कोटी दूरध्वनी संभाषणांची तपासणी करून गायकवाड या साधकाचा क्रमांक शोधून काढला. यातूनच त्याला हेतुपूर्वक अटक करण्यात आली असल्याचे दिसते असेही या पत्रकात नमूद आहे. यापूर्वीही नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी ‘सनातन’च्या अनेक साधकांची अशीच चौकशी करण्यात आली होती. गायकवाड याला संशयावरून अटक करण्यात आल्याचे पोलीस सांगत आहेत. लवकरच यामागील सत्य उजेडात येईल. सनातन ही अध्यात्मिक संस्था असल्याने प्रत्यक्ष कायदेशीर मदत करू शकत नाही. मात्र, िहदू विधिज्ञ परिषद किंवा अन्य िहतचिंतक अधिवक्ता यांच्यामार्फत साहाय्य पुरविण्यात येईल.
निष्पाप समीरला संशयावरून अटक करण्याची पोलिसांची कृती संशयास्पद असून, एखाद्याला संशयावरून ताब्यात घेतल्यानंतर २४ तास पडताळणी करूनच अटक करण्यात येते. मात्र ताब्यात घेतल्यानंतर अवघ्या काही तासांतच त्याच्यावर अटकेची कारवाई करणे संशयास्पद असल्याचे मराठे यांनी म्हटले आहे.

तपास यंत्रणेवर अभिनंदनाचा वर्षांव
कोल्हापूर: पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ नेते कॉ. गोिवद पानसरे यांच्या हत्येनंतर राज्यातील विवेकशील विचारसरणीला जबर धक्का बसल्याने त्याचे तीव्र पडसाद उमटत टीकेचा झोत पोलीस तपास यंत्रणेवर राहिला. सात महिन्यांनंतर पोलिसांना बुधवारी प्रथमच तपासात निश्चित असे सूत्र हाती लागल्याने अभिनंदनाचा वर्षांव पाहायला मिळाला. याच वेळी मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचण्याची धमक दाखवावी, अशा प्रतिक्रिया पानसरे कुटुंबीयांपासून ते चळवळीतील पुरोगामी नेतृत्वाकडून व्यक्त होत आहेत.
राज्याच्या विधिमंडळातही तपासाबद्दल जोरदार टीका करण्यात आली होती. पानसरे यांच्या निधनानंतर सनातन प्रभातने लिहिलेल्या लेखात वापरलेली भाषा क्लेशदायक होती. याची दखल घेऊन संजय कुमार या अनुभवी अधिकाऱ्याकडे पानसरे खुनाच्या तपासाची सूत्रे सोपवण्यात आली.कुमार यांच्या हाती समीर गायकवाड हा तरुण लागला आहे. हत्येत त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कितपत सहभाग आहे हे शोधण्याचे काम पोलिसांना करावे लागणार आहे.