भिवंडी-वाडा-मनोर या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नसतानाही त्या ठिकाणी टोलवसुली सुरू करण्यात आल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी दुपारी या टोलनाक्यावर आंदोलन करून कंपनीच्या एका कर्मचाऱ्यास बेदम मारहाण केली. या मारहाणीदरम्यान कर्मचाऱ्यानेही हवेत गोळीबार केल्याने वातावरण अधिकच तणावाचे बनले होते. या गोळीबारात दोन कार्यकर्ते जखमी झाल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे तर हवेत गोळीबार करण्यात आल्याने कोणीही जखमी झाले नसल्याचे वाडा पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या घटनेप्रकरणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
भिवंडी-वाडा-मनोर या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. असे असतानाही या महामार्गावरील अनगाव (ता. भिवंडी) आणि वाघोटे (ता. वाडा) या दोन ठिकाणी सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने टोल वसुली सुरू केली आहे. याविरोधात ठाणे जिल्हा (ग्रामीण) काँग्रेस, श्रमजीवी संघटना तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आदींनी वरीष्ठ पातळीवर तक्रारी केल्या आहेत. मात्र, तरीही कंपनीने टोल वसूली सुरूच ठेवली आहे. याच पाश्र्वभूमीवर वाडा तसेच विक्रमगड येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वाघोटे टोलनाक्यावर आंदोलन करून टोलनाक्याची तोडफोड केली. तसेच या टोलनाक्यावर असलेले कंपनीचे कर्मचारी जयेश चौधरी यांनाही आंदोलनकर्त्यांंनी मारहाण केली. त्यावेळी जयेश यांनी स्वत:कडील रिव्हॉल्व्हरमधून हवेत गोळीबार केला. या प्रकारामुळे जमाव अधिकच संतप्त झाला आणि त्यांनी जयेश यांना बेदम मारहाण केली. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सूरू आहेत. दरम्यान, या प्रकरणी ठाणे जिल्हा (ग्रामीण) काँग्रेसचे सरचिटणीस नीलेश सांबरे, नरेश आक्रे, प्रमोद भोईर, समीर पाटील, पिंका पडवळे, हबीब शेख, प्रमोद पाटील यांच्यासह २२ जणांविरोधात वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. दरम्यान, जयेश चौधरी यांनी रिव्हॉल्व्हरमधून झाडलेल्या गोळ्या हबीब शेख आणि ज्ञानेश्वर उज्जनकर या दोघांना चाटून गेल्याने ते जखमी झाले आहेत, असा दावा नीलेश सांबरे यांनी केला आहे. मात्र, हवेत गोळीबार झाल्याने त्यात कोणीही जखमी झालेले नाही, असे वाडा पोलिसांकडून सांगण्यात आले. तसेच भिवंडी-वाडा-मनोर या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नसतानाही त्या ठिकाणी टोलवसुली सुरू करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे सांबरे यांनी सांगितले आहे.