उर्वरित मुंबई तर सोडाच पण खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाच्या आजुबाजुला कलानगरामध्ये प्रचंड पाणी साचलं आहे. तळमजल्यावर राहणारे लोक आपलं मौल्यवान सामान सुरक्षित ठिकाणी नेत आहेत. किमान ते बघून तरी ‘आम्ही मुंबई बुडवून दाखवली’ हे मान्य करून शिवसेनेनं जनतेची माफी मागितली पाहिजे, असे म्हणत काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. मुंबईत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याच्याही घटना घडल्या आहेत. यावर चव्हाण यांनी ट्विटरवरून आपला संताप व्यक्त केला.

दुःख म्हातारी मेल्याचं नाही, काळ सोकावल्याचं आहे. मुसळधार पावसानंतर जनजीवन ठप्प झालं आहे. मात्र, मुंबई कुठे तुंबली, असा प्रतिप्रश्न महापौर करत आहेत. प्रशासकीय अपयश आणि नालेसफाईतील भ्रष्टाचारामुळे दरवर्षीच मुंबई पाण्याखाली जाते. पण कधी भरतीवर, तर कधी पावसावर खापर फोडून सत्ताधारी मोकळे होतात, हे संतापजनक असल्याचे चव्हाण म्हणाले. मालाड, कल्याण, पुण्यात भिंत कोसळून २५ बळी गेले आहेत. तर मुंबईत रस्ते वाहून गेलेत. यासाठी पावसाइतकाच भ्रष्टाचार कारणीभूत नाही का? असा सवाल चव्हाण यांनी यावेळी केला. तसेच कदाचित या सर्व भ्रष्टाचारात सरकार सर्वांना ‘क्लीन चीट’ देईल. पण त्याने गेलेले जीव परत येणार आहेत का? पुन्हा अशा घटना घडणार नाहीत, याची हमी मिळणार आहे का? असे म्हणत त्यांनी सरकारला धारेवर धरले.

मुंबईत ठिकठिकाणी स्थानिक व बाहेरगावचे प्रवासी अडकून पडले आहेत. मदत तर सोडाच पण रेल्वे केव्हा सुरळीत होईल, याची साधी माहितीसुद्धा त्यांना मिळत नाही. लोक प्रचंड हालापेष्टा सहन करताहेत. सरकारने युद्धस्तरावर उपाय करून हे लोक सुरक्षित ठिकाणी पोहोचतील, यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.