ऊर्जा खात्यामधील नियुक्त्यांवरुन महाविकास आघाडीत नाराजी असल्याची चर्चा सुरु आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज कंपन्यांवर केलेल्या अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्यांचा फेरविचार केला जाईल असं सांगितलं आहे. परस्पर केलेल्या नियुक्त्यांमुळे वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी ही माहिती एबीपीशी बोलताना दिली आहे. यावेळी त्यांनी सरकार तीन पक्षांचं असल्याने सर्वांशी चर्चा करुनच निर्णय घेतला जावा असंही सांगितलं.

“ऊर्जा खात्यामधील नियुक्त्यांचा फेरविचार करणार. तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन निर्णय घेत नियुक्त्त्या झाल्या पाहिजेत. आमच्यात कोणतीही नाराजी नाही. काही गोष्टी घडत असतात. काही विषय असतील तर आम्ही दुरुस्ती करत असतो. पण याला नाराजी म्हणणं योग्य नाही,” असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे. यावेळी त्यांनी सारथीचा कारभार काँग्रेसकडेच राहिला पाहिजे असा आमचा आग्रह आहे असंही म्हटलं. तसंच मुख्यमंत्र्यांना याबाबत कळवण्यात आलं आहे अशी माहिती दिली.

“निधी वाटप सर्व आमदारांना समान लेखून केलं पाहिजे हे आमचं म्हणणं आहे. शिवसेना, राष्ट्रवादीच्या आमदारांचंही हेच म्हणणं आहे. सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे. सरकार चालवताना या गोष्टी होत असतात. चर्चा केली जाते, धोरणं ठरवली जातात. काही समस्या आल्या तर त्यातून मार्ग काढत असतो,” असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे. दरम्यान परस्पर केलेल्या नियुक्त्यांवरील वादानंतर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज कंपन्यांवर केलेल्या अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत.