News Flash

“आम्हाला एकटं लढू द्या, मग बघा”, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांचा इशारा!

काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी मुंबईत स्वबळावर लढण्याचा इशारा दिला आहे. मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी एकटं लढू देण्याची मागणी केली आहे.

भाई जगताप यांचा शिवसेना-राष्ट्रवादीला इशारा!

राज्यात महाविकासआघाडी सरकारमध्ये सारंकाही आलबेल असल्याचं वारंवार सांगितलं जातं. मात्र, त्याचवेळी दुसरीकडे काँग्रेसमधून वेगळा स्वबळाचा सूर लावला जात आहे. आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार असल्याचं पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आधीच स्पष्ट केलं असताना आता मुंबईत देखील काँग्रेसने स्वबळाचा सूर लावला आहे. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी राहुल गांधींच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना स्वबळावर लढू देण्याची विनंती पक्षश्रेष्ठींना केली आहे. त्यामुळे काँग्रेसनं राज्यातील सत्ताकाळाला ५ वर्ष पूर्ण होण्याआधीच पूर्ण फारकतीचे इशारे दिल्यामुळे महाविकासआघाडीमध्ये सारंकाही आलबेल नसल्याचंच दिसून येत आहे.

…मग बघुयात किसमे कितना है दम!

भाई जगताप यांनी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमामध्ये एकटं लढू देण्याची परवानगी पक्षश्रेष्ठींना मागितली आहे. “काल-परवापर्यंत काँग्रेसचा कॉग्निझन्स लोक घेत नव्हते. आज फक्त काँग्रेस काय करतेय हे बघत आहेत. मग ते मुंबई असो वा महाराष्ट्र असो. माझी तुमच्याकडे विनंती आहे. राहुल गांधींना विनंती आहे. सोनिया गांधींना विनंती आहे. आम्हाला एकटं (स्वबळावर) लढू द्या. तेव्हा बघुयात किस मे है कितना दम”, असं भाई जगताप म्हणाले आहेत. या पार्श्वभूमीवर आता राज्यातील काँग्रेसचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून याविषयी घेतली जाणारी भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

मुंबई पालिकेचा अवघड पेपर!

अवघ्या वर्षभरावर मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका आल्या आहेत. करोनाची परिस्थिती सामान्य असली, तर मुंबई पालिकेच्या निवडणुका होतील, असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यात सत्ता हातची गेल्यानंतर भाजपाकडून मुंबई महानगर पालिकेसाठी पूर्ण जोर लावला जाऊ शकतो. मात्र, या पार्श्वभूमीवर शिवसेनेला भाजपासोबतच काँग्रेसचाही निवडणुकीत सामना करावा लागतोय की काय? अशी शक्यता आता निर्माण झाली आहे. २०१७ साली झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपाला ८२ तर शिवसेनेला एक जागा जास्त म्हणजे ८३ जागा जिंकता आल्या होत्या. त्यामुळे यंदा शिवसेनेसमोर भाजपाचं कडवं आव्हान असणार आहे. त्यातच राज्यातील मित्रपक्ष काँग्रेसने स्वबळाचा सूर आळवायला सुरुवात केल्यामुळे शिवसेनेसाठी मुंबई महानगर पालिकेचा पेपर दिवसेंदिवस कठीण होताना दिसत आहे.

..तर पाठीत खंजीर खुपसल्यासारखं होईल, आम्ही स्वतंत्रच लढणार – नाना पटोले

स्वबळावरून काँग्रेसमध्येच मतभेद

काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा निवडुका काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र, त्यापाठोपाठ माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी स्वबळाच्या निर्णयासाठी पार्टी हायकमांडकडे बोट दाखवलं आहे. त्यामुळे स्वबळाच्या निर्णयावरून देखील काँग्रेसमध्ये मतभेद असल्याचं दिसत आहे.

काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार का?; बाळासाहेब थोरात म्हणतात…

मुंबई काँग्रेसमधूनच भाई जगतापांविरोधात तक्रार

दरम्यान, मुंबई काँग्रेसमध्ये देखील सारंकाही आलबेल असल्याचं चित्र दिसत नाहीये. दोनच दिवसांपूर्वी मुंबईतील वांद्रे पूर्वमधील पक्षाचे आमदार झिशान सिद्दिकी यांनी भाई जगताप यांच्याविरोधात थेट पार्टी हायकमांडकडे तक्रार केली होती. त्यावरून दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप देखील झाले होते. त्यामुळे अंतर्गत वाद किंवा मतभेदांवर तोडगा काढून स्वबळावल लढण्यासाठी काँग्रेस कितपत सक्षम आहे, याचा निर्णय आता पार्टी हायकमांडकडून होण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2021 2:33 pm

Web Title: congress bhai jagtap on fighting bmc elections alone next year shivsena ncp on alert pmw 88
Next Stories
1 “मुंबईचा मतदार शिवसेनेला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही”
2 हाऊसिंग सोसायटी, प्रोडक्शन हाऊसनंतर मुंबईतील कॉलेजपर्यंत पोहोचला लसीकरण घोटाळा
3 Video : गोष्ट मुंबईची – पश्चिम रेल्वेवरील स्थानकांची नावं कशी पडली – भाग २
Just Now!
X