महापौरपदासाठी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवापर्यंत मुदत

मुंबईच्या महापौर पदासाठी येत्या २२ नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार असून त्याकरिता अर्ज सादर करण्यासाठी सोमवारी, १८ नोव्हेंबपर्यंतची मुदत आहे. एकीकडे, पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेतून महापौर पदासाठी कुणाला उमेदवारी मिळणार, याबाबतचे गूढ कायम असतानाच, काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनीही सावध पवित्रा घेत आपली भूमिका उघड केलेली नाही. त्यामुळे यंदा महापौरपदाच्या निवडणुकीतील उत्कंठा वाढली आहे.

महापौर पदाचा पहिला अडीच वर्षांचा कालावधी २१ नोव्हेंबरला संपणार असून नव्या महापौरांची निवड करण्यासाठी २२ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता विशेष सभा बोलावण्यात आली आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता असून शिवसेनेचे संख्याबळ सर्वात जास्त आहे. त्यामुळे शिवसेनेनेला चिंता नसली तरी बदलत्या राजकीय परिस्थितीत शिवसेनेलाही सावध पावले उचलावी लागणार आहेत. राज्य सरकार स्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नसताना व मुख्यमंत्री कोण होणार हे अजून निश्चित झालेले नसताना पालिका वर्तुळात मात्र महापौर कोण होणार याकडे सगळ्यांच लक्ष लागले आहे. सोमवारी १८ नोव्हेंबरला संध्याकाळी ६ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत असून कॉंग्रेस आणि भाजप नक्की काय भूमिका घेणार त्याचे पत्तेही यानिमित्ताने उघड होतील. तर प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी सकाळी अर्ज मागे घेता येणार आहे.

पालिकेत विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसचे संख्याबळ कमी असले तरी निवडणूक बिनविरोध होऊ नये म्हणून कॉंग्रेस पक्ष आपला उमेदवार देत असतो. यंदा मात्र राज्यात सरकार स्थापनेसाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात चर्चेच्या बैठका होत असल्यामुळे उमेदवार द्यावा की न द्यावा याबाबत कॉंग्रेसचे तळ्यात मळ्यात सुरू आहे.  सरकार स्थापनेचा तिढा सुटलेला नसताना भाजपने मात्र थांबा आणि वाट बघा अशी भूमिका घेतली आहे. हीच भूमिका पालिकेच्या राजकारणातही सध्यातरी भाजपने घेतलेली दिसते. युती तुटल्याचे अधिकृतपणे दोघांपैकी कोणीच जाहीर केलेले नाही. त्यामुळे भाजप काय भूमिका घेणार याकडेही सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

२२३ सदस्यच सहभाग घेऊ शकणार

मुंबई महापालिकेत एकूण २२७ सदस्य असून त्यापैकी पाच सदस्य जात पडताळणी प्रकरणामुळे बाद झाले आहेत किंवा न्यायालयीन प्रकरणात अडकलेले आहेत. त्यापैकी भाजपच्या केसरबेन पटेल यांचे नगरसेवक पद गेल्यामुळे त्याजागी कॉंग्रेसचे नितीन सलाग्रे यांना नगरसेवक मिळण्याची संधी निर्माण झाली आहे. या आठवडय़ात सभागृहात सलाग्रे यांच्या नावाची घोषणा झाल्यास कॉंग्रेसचा एक सदस्य वाढणार असून संख्याबळ २९ होणार आहे. त्यामुळे एकून २२३ सदस्य या निवडणुकीत प्रत्यक्ष सहभागी होऊ शकणार आहेत.

पक्षीय बलाबल

शिवसेना         ९४

भाजप ८३

कॉंग्रेस २८

राष्ट्रवादी        ८

समाजवादी पक्ष          ६

एमआयएम       २

मनसे    १

जात पडताळणीमुळे

प्रलंबित – ५