X

Bharat Bandh : ऐन उत्सवात बाजार बंद!

‘भारत बंद’मुळे गणेशोत्सवाच्या तयारीत विघ्न

‘भारत बंद’मुळे गणेशोत्सवाच्या तयारीत विघ्न; काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेचे वर्चस्व असलेल्या भागांत शुकशुकाट; रस्ते-रेल्वे वाहतूक मात्र सुरळीत

इंधन दरवाढ आणि वाढती महागाई यांच्याविरोधात काँग्रेससह २१ राजकीय पक्षांनी पुकारलेल्या देशव्यापी बंदला सोमवारी मुंबईतून चांगला प्रतिसाद मिळाला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही या बंदमध्ये सहभागी झाल्याने या तिन्ही पक्षांचे वर्चस्व असलेल्या भागांत सोमवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. मध्य मुंबई तसेच पूर्व उपनगरांत काही ठिकाणी आंदोलकांनी सरकारविरोधात निदर्शने केली तसेच वाहतूक बंद पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे मुंबईतील रस्ते-रेल्वे वाहतूक सुरळीत होती. परंतु, व्यापारी तसेच विक्रेत्यांनी बंदमध्ये सहभाग दर्शवल्याने ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठांत शुकशुकाट होता.

काँग्रेसने पुकारलेल्या ‘भारत बंद’ला पाठिंबा देत मनसेने रविवारीच बंदमध्ये सहभाग घेण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे मुंबईत बंदचा प्रभाव जाणवेल, अशी अटकळ बांधली जात होती. ती सोमवारी खरी ठरली. मनसे तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीकडून उग्र आंदोलन होण्याच्या भीतीने दादर, परळ, लालबाग येथील सर्व बाजारपेठा व दुकाने सोमवारी सकाळपासूनच बंद ठेवण्यात आली होती. गणेशोत्सवाच्या आठवडाभर आधीपासून या ठिकाणच्या बाजारांत ग्राहकांची झुंबड उडाल्याचे पाहायला मिळते. गणेशोत्सव असल्याकारणाने सोमवारीदेखील दादर, लालबाग येथील बाजारपेठा सुरू ठेवण्यात येणार होत्या. मात्र, आंदोलकांच्या धास्तीमुळे दुकानदारांनी सोमवारी सर्व व्यवहार बंद ठेवले. त्यामुळे खरेदीदारांचा    हिरमोड तर झालाच. मात्र दुकानदारांनादेखील मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. दरम्यान, दुपारी ३ वाजेपर्यंतच बंद घोषित केला असल्याने सायंकाळी मात्र बाजारपेठा पुन्हा फुलून गेल्याचे चित्र होते.

पूर्व उपनगरांत विशेषत: चेंबूर, गोवंडी या भागांत बंदचा परिणाम दिसून आला. चेंबूरमध्ये मनसेने सकाळी ९च्या सुमारास चेंबूर नाका येथील एका पेट्रोल पंपावर गाढवाच्या गळ्यात बॅनर बांधून आंदोलन करत पेट्रोल पंप बंद केला. त्यानंतर साडेनऊच्या सुमारास राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी त्यांच्या काही कार्यकर्त्यांसह गोवंडी रेल्वे स्थानकात घुसून रेल रोको करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना रेल्वे स्थानकातच रोखत, ताब्यात घेतले. त्यानंतर काही वेळाने पोलिसांनी त्यांना सोडून देताच, पुन्हा ते कार्यकर्त्यांसह पूर्व मुक्त मार्गावर आंदोलन करण्यासाठी गेले. या ठिकाणी त्यांनी १० ते १५ मिनिटे पूर्व मुक्त मार्ग रोखून धरला होता. त्यानंतर मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत, पोलीस ठाण्यात नेले. घाटकोपरमध्येदेखील एलबीएस मार्गावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ५ ते १० मिनिटे रास्ता रोको केला होता. विक्रोळी आणि मुलुंड रेल्वे स्थानकात सकाळी ११ च्या सुमारास मनसेच्या कार्यकर्त्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र या ठिकाणीदेखील पोलिसांचा कडक बंदोबस्त असल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.

‘बेस्ट’बसचे नुकसान

सोमवारी सकाळी प्लाझा सिनेमाच्या चौकात मनसे आणि काँगेसच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. या वेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढली होती. त्यामुळे पोलिसांनी निदर्शनाचे नेतृत्व करणारे मनसे नेते नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे यांच्यासह काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. लालबाग येथील मार्केट परिसरात सकाळी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह निदर्शने केली. या वेळी कार्यकर्ते हिंसक झाल्याने त्यांनी तीन बेस्ट गाडय़ांच्या काचा फोडल्या. त्यानंतर पोलिसांना नांदगावकर यांना ताब्यात घेतले.

वाहतूक कोंडी नाही

‘भारत बंद’च्या पाश्र्वभूमीवर अनेकांनी आज घरातून बाहेर न पडताच आराम केला. परिणामी सोमवारी रस्त्यावर अगदीच तुरळक वाहतूक पाहायला मिळाली. त्यातच पोलिसांनी सर्वच ठिकाणी चोख बंदोबस्त लावल्याने कुठेही आंदोलकांना वाहने अडवता आली नाही. त्यामुळे पूर्व उपनगरातील शीव-पनवेल रोड, पूर्व मुक्त मार्ग, पूर्व द्रुतगती मार्ग, घाटकोपर- मानखुर्द लिंक रोड या मार्गावर कुठेही वाहतूक कोंडी झाली नाही.

पश्चिम उपनगरांत दुपारनंतर व्यवहार सुरू

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सकाळी विलेपार्ले येथे काढलेल्या रॅलीमुळे सर्व दुकाने बंद करण्यात आली होती. तर गोरेगाव, मालाड येथील दुकाने दुपापर्यंत पूर्णपणे बंद होती. अंधेरीमध्ये सकाळी झालेल्या रेल रोकोमुळे स्थानकांजवळची सर्व दुकाने दुपारी उशिरापर्यंत बंद ठेवण्यात आली होती. अंधेरीमधले वातावरण शांत झाल्यानंतर दुपारी एकच्या नंतर बाजारपेठा हळूहळू सुरू झाल्या. मालाडमधील सर्व खाद्यपदार्थ विक्रे त्यांची दुकाने, मखर, पूजेचे साहित्य, कपडा बाजार, होलसेल दुकानेही दुपारनंतर सुरू झाली.  बहुतांश शाळांनी आधीच सुट्टी जाहीर केल्याने शाळेच्या बसगाडय़ा दिसत नव्हत्या. मात्र, महाविद्यालये सुरू होती.