News Flash

दोन जिल्हा परिषदा जिंकल्याने काँग्रेसचा आत्मविश्वास बळावला

लोकसभा निवडणुकीच्या अगोदर झालेल्या तीनपैकी दोन जिल्हा परिषदांची सत्ता मिळाल्याने काँग्रेसचा आत्मविश्वास बळावला आहे.

| December 3, 2013 01:42 am

लोकसभा निवडणुकीच्या अगोदर झालेल्या तीनपैकी दोन जिल्हा परिषदांची सत्ता मिळाल्याने काँग्रेसचा आत्मविश्वास बळावला आहे. नंदुरबारची सत्ता गमवावी लागली तर अन्यत्र जागा कमी झाल्याने राष्ट्रवादीची पिछेहाट झाली. भाजप-शिवसेना युतीला मात्र प्रभाव पाडता आलेला नाही.
नंदुरबार हा काँग्रेसचा पारंपारिक बालेकिल्ला असला तरी गेल्या वेळी राष्ट्रवादीने बहुमत प्राप्त केले होते. काँग्रेसला तेव्हा मोठा धक्का बसला होता. यंदा मात्र ५५ पैकी २९ जागा जिंकून काँग्रेसने बहुमत प्राप्त केले. राष्ट्रवादीला २५ जागा मिळाल्या. केंद्रीय मंत्री माणिकराव गावित विरुद्ध राष्ट्रवादीचे नेते आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्यात ही प्रतिष्ठेची लढाई होती. त्यात काँग्रेसने विजय मिळविला. धुळे जिल्हा परिषदेत ५६ पैकी ३० जागा काँग्रेसला मिळाल्या. भाजप (१३), राष्ट्रवादी (७) तर शिवसेनेला दोन जागा मिळाल्या. नंदुरबार आणि धुळे हे लोकसभेचे दोन्ही मतदारसंघ काँग्रेसकडे असून, या विजयामुळे काँग्रेसच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. गेल्या वेळी नंदुरबारमध्ये विजयासाठी काँग्रेसला सारी प्रतिष्ठा पणाला लावावी लागली होती. तर धुळ्यात स्वपक्षीयांच्या वादात भाजपला विजय मिळाला होता.
अकोला जिल्हा परिषदेत ५३ पैकी २३ जागा जिंकून प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाने वर्चस्व कायम राखले. भाजप (१२) तर शिवसेनेला आठ जागा मिळाल्या. काँग्रेसचे पाच तर राष्ट्रवादीचे दोन उमेदवार निवडून आले. सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस प्रकाश आंबेडकर यांना मदत करण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत आंबेडकर यांनी आघाडीत सामील व्हावे, असा काँग्रेसचा प्रयत्न सुरु आहे.
राष्ट्रवादीला काँग्रेसचा टोला
पाच वर्षांंपूर्वी झालेल्या याच जिल्हा परिषदांच्या निकालांच्या आधारे आघाडीत राष्ट्रवादीने जास्त जागांची मागणी केली होती. आता काँग्रेसला जास्त जागा मिळाल्या आहेत. म्हणून आम्ही लगेचच जास्त जागांची मागणी करणार नाही, पण या निकालांचा राष्ट्रवादीने बोध घ्यावा, असा सल्ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी राष्ट्रवादीला दिला. राज्यातील जनता काँग्रेसबरोबर आहे हे या निकालाने स्पष्ट झाले आहे. अकोल्यात समाधानकारक यश मिळू शकले नाही याची कबुली ठाकरे यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2013 1:42 am

Web Title: congress confidence build after winning two zila parishad election
टॅग : Congress
Next Stories
1 ‘आम्ही मुंबईकर’ दिनदर्शिकेचे आज प्रकाशन
2 बदलापूरमध्ये वाहतूकदारांचा कडकडीत बंद
3 पप्पू कलानीला जन्मठेप
Just Now!
X