पालिका निवडणूक पार पडल्यानंतर जेमतेम महिना लोटल्यानंतर ज्येष्ठ नगरसेवकांचे बैठकांना दांडीसत्र सुरू झाले आहे. मात्र, एक नवनिर्वाचित नगरसेविका आपल्या तान्हय़ा बाळाला घेऊन पालिका सभागृहाच्या बैठकांना हजेरी लावत असल्याचे निदर्शनास आले असून हे तान्हे बाळ सध्या पालिकेचा चर्चेचा विषय बनले आहे. तर बाळाचे संगोपन करण्यासाठी आणि पत्नीला मदत करण्यासाठी बाळाच्या बाबांनी नोकरीला रामराम ठोकला आहे.

मालाड येथील मार्वे परिसरातील प्रभागामधून काँग्रेसच्या नगरसेविका स्टेफी केणी विजयी झाल्या. महापौर, उपमहापौर निवडणुकीच्या वेळी स्टेफी केणी आपल्या तान्हय़ा बाळासह पालिका मुख्यालयात अवतरल्या. महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीच्या वेळी त्यांचे अवघ्या तीन महिन्यांचे बाळ त्यांचा नातेवाईक सभागृहाबाहेर सांभाळत होता. त्यानंतर झालेल्या पालिका सभागृहाच्या दोन बैठकांच्या वेळीही त्या आपल्या बाळाला सोबत घेऊनच पालिकेत आल्या होत्या. पालिकेतील कामकाजाची तोंडओळख करायची आणि मुलाची हेळसांड होऊ द्यायची नाही यासाठी केणी दाम्पत्याला सध्या तारेवरची कसरत करावी लागत आहे.

आपल्या तान्हय़ा बाळाकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून स्टेफी केणी यांचे पती मार्यू ग्रेसेस यांनी नोकरीला रामराम ठोकला असून बाळाच्या संगोपनाची मोठी जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. आपल्या पत्नीने राजकारणात पदार्पण केले असून तिला सहकार्य करण्याच्या भावनेने त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे.नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या स्टेफीला सहकार्य करण्यासाठी, तसेच बाळाच्या संगोपनासाठी मी नोकरीचा राजीनामा दिला. बाळ मोठे झाल्यानंतर आपण पुन्हा नोकरी करू, असे सांगत मार्यू म्हणाले की, पालिकेमध्ये कधी मी, तर कधी आई बाळाला सांभाळते.

स्वतंत्र कक्षाची गरज

बाळ खूपच लहान आहे. त्यामुळे त्याला घरी ठेवून पालिका सभागृहाच्या बैठकीसाठी येणे शक्य होत नाही. त्यामुळे त्याला सोबत आणावे लागते. मात्र आई, सासूबाई आणि पती बाळाचे संगोपन करीत असल्यामुळे मला पालिका सभागृहाच्या कामकाजात सहभागी होता येते. बाळाला पालिका मुख्यालयातील सभागृहाबाहेरील व्हरांडय़ात घेऊन उभे राहावे लागते. पालिकेत माता आणि बाळासाठी स्वतंत्र कक्षाची व्यवस्था करणे आवश्यक आहे. प्रशासनाने त्याचा विचार करायला हवा, अशी  विनंती स्टेफी केणी यांनी केली आहे.