सलग सहाव्या दिवशी मंगळवारी नगरसेवकांनी पालिका सभागृहात गोंधळ घातला. कॉंग्रेस नगरसेवक प्रविण छेडा यांनी महापौरांच्या गा़डीवरील लाल दिव्याचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला. परंतु हा हरकतीचा मुद्दा होऊ शकत नाही असे सांगत महापौरांनी आगामी अर्थसंकल्पावरील चर्चेला सुरूवात केल्याने सभागृहात गोंधळ सुरू झाला. दरम्यान, काँग्रेस नगरसेवक नौसिर मेहता यांनी महापौरांचा राजदंड पळवला. त्यानंतर शिवसेना आणि कॉंग्रेस नगरसेवकांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर मेहता यांना दिवसभरासाठी निलंबित करण्यात आलं.
महापौर बेकायदेशीररित्या लाल दिव्याची गाडी वापरतात. न्यायालयाकडून निर्णय येऊनही महापौर स्वत:च्या गाडीवरील लाल दिवा काढायला तयार नाहीत, त्यामुळे महापौर दिवा काढणार नाही तोपर्यंत शहरात त्यांची गाडी अडवू, असं कॉंग्रेस नगरसेवक प्रवीण छेडा म्हणाले. कॉंग्रेस नगरसेवकांनी आयुक्तांची भेट घेऊन त्यांना याबाबत पत्रही दिलं.