काँग्रेस नगरसेवकांच्या अंगावर धावून आलेल्या शिवसेना नगरसेवकांना निलंबित करा आणि काँग्रेसच्या सहा नगरसेविकांवरील निलंबनाची कारवाई मागे घेण्याच्या मागणीसाठी काँग्रेस नगरसेवकांनी पाचव्या दिवशीही पालिका सभागृहात हैदोस घातला. या गोंधळातच आगामी अर्थसंकल्पावरील चर्चेला सुरुवात झाली.
महारौपांच्या विरोधात घोषणाबाजी करीत, शिट्टय़ा वाजवून, घंटीनाद करीत काँग्रेस नगरसेवक चर्चेमध्ये अडथळा निर्माण करीत होते. तर निलंबित सहा नगरसेविका सभागृहाचे दरवाजे ठोठावून महापौरांना आव्हान देत होत्या.
पालिकेच्या २०१५-१६ च्या अर्थसंकल्पावरील चर्चेला सोमवारी पालिका सभागृहात सुरुवात होताच विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी शुक्रवारी सभागृहातच आपल्या पक्षाच्या नगरसेवकांच्या अंगावर धावून आलेल्या शिवसेना नगरसेवकांना निलंबित करा, तसेच काँग्रेसच्या निलंबित नगरसेविकांवरील कारवाई मागे घेण्याची मागणी केली.
मात्र महापौर स्नेहल आंबेकर यांनी त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. त्यामुळे काँग्रेस नगरसेवकांनी घंटानाद, शिटय़ा फुंकत, महापौरांच्या विरोधात घोषणाबाजी करीत सभागृहात प्रचंड गोंधळ घातला. या गोंधळातच महापौरांनी अर्थसंकल्पावरील भाषणासाठी काँग्रेस नगरसेवक नोशीर मेहता यांचे नाव पुकारले. मेहता यांनी भाषणाच्या निमित्ताने महापौरांनाच कानपिचक्या दिल्या. मात्र त्यावरून शिवसेनेचे नगरसेवकही भडकले आणि त्यांनीही काँग्रेसच्या नगरसेवकांना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. उभय पक्षांमध्ये घोषणाबाजीला ऊत आला होता. मात्र काही मिनिटांतच शिवसेनेचे नगरसेवक शांत झाले. मात्र काँग्रेसचा गोंधळ सुरूच होता.