विधान भवनाच्या पायऱ्यांवर अडविले असता झालेल्या धक्काबुक्कीच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसच्या वतीने राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे दिलगिरी व्यक्त करण्यात आली. देवेंद्र फडणवीस सरकार विधानसभेत बहुमत सिद्ध करू शकलेले नाही. यामुळेच या सरकारला पुन्हा बहुमत सिद्ध करण्यास भाग पाडावे व तोपर्यंत कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्यास मज्जाव करावा या मागणीसाठी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, विधिमंडळ गटनेते राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार भालचंद्र मुणगेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सर्वात आधी राज्यपालांची दिलगिरी व्यक्त केली. अभिभाषणासाठी येत असताना काँग्रेस आमदारांनी भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर राज्यपालांना रोखून धरले होते. तेव्हा धक्काबुक्की झाली होती. याबाबत राज्यपालांना दिलेल्या निवेदनातही माफी मागण्यात आली.