केंद्र सरकारचे केवळ सीबीआय आणि प्राप्तिकर विभाग यांच्यावरच नियंत्रण उरले असून या यंत्रणांचा उपयोगे राजकीय विरोधकांना दडपण्यासाठी केला जात आहे. मात्र, जनता माझ्या बाजूने असल्याने मला संपवण्याचे प्रयत्न हाणून पाडले गेले, अशा शब्दांत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केंद्र सरकार व काँग्रेसवर टीकास्त्र सोडले.
पंतप्रधानपदी आरूढ होण्याची आकांक्षा बाळगून केंद्र सरकारविरोधात रान उठविणारे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी सोमवारी हिरेबाजारातही चमक दाखवली. ‘मुंबई डायमंड र्मचट्स असोसिएशन’ च्या वतीने मोदी यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन वांद्रे-कुर्ला संकुलातील ‘डायमंड हॉल’ च्या भव्य प्रांगणात करण्यात आले होते. ‘सरदार वल्लभभाई पटेल, महात्मा गांधी यांच्या मातीत मी जन्माला आलो आहे. झोप उडालेल्या सरकारने कोणत्याही यंत्रणेचा गैरवापर केला तरी मला दाबून टाकणे शक्य नाही,’ असे मोदी यावेळी म्हणाले. देशाला विकास आणि सुराज्याच्या वाटेवर नेण्यासाठी आपण कटिबध्द असल्याचे प्रतिपादन मोदी यांनी केले.
सरकारवर टीकास्त्र सोडताना मोदी म्हणाले, ‘रुपया घसरत चालला आहे, जगभरात देशाची पत घसरत आहे. पण सरकार ते रोखू शकत नाही. सरकारची साथ जनतेने सोडली आहे. जनतेचा पंतप्रधान व कोणावरही तिळमात्र विश्वास राहिलेला नाही. आता फक्त आठ महिने बाकी असून सत्ता परिवर्तनानंतर विकासाकडे वाटचाल सुरू होईल.’
चांदीची तुला आणि नांगरांचे लोखंड
मोदींची बीकेसीमध्ये ‘चांदीची तुला’ करण्यात आली. या चांदीतून मिळणारी रक्कम ‘लोहपुरुष’ सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा उभारण्यासाठी वापरली जाईल. ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ च्या धर्तीवर जगातील सर्वाधिक उंचीचे स्मारक गुजरातमध्ये ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ म्हणून उभारले जाईल. सरदार पटेल यांच्या जयंतीदिनापासून त्यासाठी देशातील प्रत्येक शेतकऱ्याकडून नांगराचा वापरलेला लोखंडाचा एक तुकडा जमा केला जाईल आणि स्मारकाच्या कामासाठी वापरला जाईल. देशाच्या एकात्मतेचे ते प्रतीक असेल, असे मोदी यांनी सांगितले.