भारतीय जनता पक्षाच्या खासदार आणि अभिनेत्री हेमामालिनी यांच्या नाटय़ विहार केंद्राला ओशिवरा येथील मोक्याच्या ठिकाणी असलेला सुमारे दोन हजार चौरस मीटर इतका भूखंड केवळ ७० हजार रुपयांत वितरित करण्यात आल्यानंतर काँग्रेस पक्षाने त्यावर तीव्र टीका केली. पक्षाचे नेते प्रमोद तिवारी यांनी या संपूर्ण व्यवहाराची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली. कोणत्या आधारावर हेमा मालिनी यांच्या संस्थेला हा भूखंड देण्यात आला, याची चौकशी केली गेली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
हेमामालिनी यांच्या संस्थेला केवळ ७० हजारांत भूखंड!
हेमामालिनी यांना यापूर्वी वर्सोवा येथील न्यू लिंकिंग मार्गावरील भूखंड वितरित करण्यात आला होता. त्या वेळी त्यांनी दहा लाख रुपयांचा भरणा उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केला होता. मात्र या भूखंडाचा काही भाग सीआरझेडबाधित असल्यामुळे बांधकाम करण्यात अडचण होती. भूखंडविषयक नियम व अटींनुसार या भूखंडावर करावयाच्या बांधकाम खर्चाच्या २५ टक्के रक्कम शासनाकडे जमा करणे आवश्यक होते. परंतु हेमामालिनी यांच्या संस्थेने पूर्तता केली नाही. तरीही हा भूखंड शासनाकडून परत घेण्यात आला नाही. उलट या भूखंडाच्या मोबदल्यात आता पर्यायी भूखंड ओशिवरा येथे वितरित करण्यात आला आहे.