दुसऱ्या जागेसाठी चुरस; सपने काँग्रेसला ‘हात’ दाखविला
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस कोणाच्या पारडय़ात मते टाकते यावरच विधान परिषदेच्या मुंबई स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील दुसऱ्या जागेवर काँग्रेस की बंडखोर राष्ट्रवादीचा उमेदवार बाजी मारतो याचे भवितव्य ठरणार आहे.
मुंबईत २३० सदस्यांना मतदानाचा अधिकार असून, पहिल्या पसंतीची ७७ मते मिळणारा पहिल्या फेरीतच विजयी होईल. मनसेने तटस्थ राहण्याचे जाहीर केल्याने हा कोटा ६७ मतांपर्यंत येईल. शिवसेनेकडे पुरेशी मते असल्याने पर्यावरणमंत्री रामदास कदम यांना विजयाकरिता काहीच अडचण येणार नाही. दुसऱ्या जागेकरिता काँग्रेसचे भाई जगताप आणि राष्ट्रवादीचे बंडखोर प्रसाद लाड यांच्याच चुरस आहे.
काँग्रेसला धडा शिकविण्याकरिताच भाजपने खेळी केली आहे. भाजपने पहिल्या पसंतीची मते शिवसेनेला देण्याचे जाहीर केले असले तरी राष्ट्रवादीचे बंडखोर प्रसाद लाड यांना भाजपची मते मिळतील, अशी चिन्हे आहेत. समाजवादी पार्टीनेही लाड यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
तसा पक्षादेशच जारी करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे १४ नगरसेवक कोणती भूमिका घेतात यावर बरेच गणित अवलंबून आहे. भाजप, राष्ट्रवादी, समाजवादी पार्टी आणि अपक्ष यांची एकत्रित मते ६५ पेक्षा जास्त होतात. शिवसेनेची दुसऱ्या पसंतीची मतेही लाड यांना फायदेशीर ठरू शकतात.

राष्ट्रवादीची मते निर्णायक
प्रसाद लाड हे राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या जवळचे मानले जातात. पक्षाचा आशीर्वाद असल्याशिवाय ते धाडस करण्याची शक्यता नाही. लाड यांच्या उमेदवारीवरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये हातमिळवणी झाल्याचा काँग्रेसचा संशय आहे. लाड यांच्या उमेदवारीला पक्षाचा पाठिंबा नसून, पक्षाचे नगरसेवक काँग्रेसलाच मतदान करतील, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांची शनिवारी दुपारी बैठक झाली. दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांना परळच्या आय.टी.सी. हॉटेलमध्ये एकत्रित ठेवण्यात आले आहे.

काँग्रेसच्या मतांवर डोळा
काँग्रेसचे ५३ सदस्य असून, राष्ट्रवादीची १४ मते मिळाल्यास काँग्रेसला काही अडचण येणार नाही. पण काँग्रेसची काही मते फुटणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेसमधील गटबाजीचा फायदा उठविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. काँग्रेसचे पाच ते सहा नगरसेवक विरोधात मतदान करतील, असा दावा लाड आणि भाजपकडून केला जात आहे.