जागावाटपात निम्म्या जागांची राष्ट्रवादीची मागणी मान्य करणे शक्यच नाही, असे मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केले असले तरी काँग्रेसचे नवी दिल्लीतील नेतृत्व ऐन वेळी शरद पवार यांच्यापुढे कच खाते, हा पूर्वानुभव लक्षात घेता राज्यातील नेत्यांनी कितीही विरोध केला तरीही काँग्रेस शेवटपर्यंत ठाम राहण्याबाबत साशंकताच आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांच्या समन्वय समितीच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या वतीने १४४ जागांची मागणी करण्यात आली. निम्म्या जागांपेक्षा कमी जागा स्वीकारणार नाही, अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. काँग्रेसने मात्र एवढय़ा जागा सोडण्यास ठाम नकार दिला. गतवेळच्या तुलनेत कमी जागा स्वीकारणार नाही. काही जागांची अदलाबदल होऊ शकते, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केले. दोन्ही पक्षांचा योग्य सन्मान होईल, असा तोडगा काढण्याचा प्रयत्न राहील. पण एकतर्फी निर्णय होणार नाही, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केले आहे. राष्ट्रवादीच्या मनाप्रमाणे होणार नाही, असे चित्र काँग्रेसने पहिल्या बैठकीनंतर तरी रंगविले आहे.
राष्ट्रवादीची माघार नाही
निम्म्या जागांची मागणी काँग्रेसला मान्य नसली तरी आठवडाभरात निर्णय घेतला जावा, अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. काँग्रेसच्या भूमिकेच्या पाश्र्वभूमीवर पक्षाची रणनीती निश्चित करण्याकरिता येत्या शनिवारी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत काही निवडक नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यात पक्षाची भूमिका निश्चित केली जाईल, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले.
काँग्रेसची पडती भूमिका
गेल्या दहा वर्षांत काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने नेहमीच राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यापुढे सपशेल माघार घेतली आहे. अगदी गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे २० आमदार जास्त निवडून आल्यावरही खाते वाटपात राष्ट्रवादीचा वरचष्मा राहिला होता. यूपीए सरकारमध्ये काँग्रेसकडून पवारांना झुकते माप दिले गेले. राष्ट्रवादीच्या खासदारांचे संख्याबळ कमी होते, तरीही कृषी आणि अन्न व पुरवठा तसेच हवाई वाहतूक यासारखी महत्त्वाची खाती सोपविण्यात आली होती. पवारांनी डोळे वटारले आणि काँग्रेस नेतृत्वाने माघार घेतली, असे नेहमीच घडले. ही पाश्र्वभूमी लक्षात घेता आघाडी कायम राहिल्यास काँग्रेसकडून नेहमीप्रमाणेच राष्ट्रवादीच्या कलाने घेतले जाईल, अशी शक्यता नाकारता येत नाही.
आघाडी कायम राहणर का ?
आघाडी कायम ठेवण्याचे सारे राष्ट्रवादीवर अवलंबून आहे. लोकसभेच्या पराभवाचे खापर राष्ट्रवादीचे नेते सातत्याने काँग्रेसवर फोडत आहेत. राष्ट्रवादीने चर्चेच्या पहिल्याच फेरीत आक्रमक भूमिका घेतल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मनात काय आहे, याचा अंदाज काँग्रेस नेते घेत आहेत. महायुतीचे आव्हान तसेच स्वबळावर लढण्यास सर्व समाजाची मते मिळण्याबाबत असलेली साशंकता हे लक्षात घेता राष्ट्रवादी निवडणूक आघाडीतूनच लढवेल, असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. निकालानंतर वेगळी समीकरणे होऊ शकतात.