मुंबई : काँग्रेसला अयोध्येत राममंदिर होऊ द्यायचे नसल्याचा आरोप करीत केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी राममंदिराबाबत काँग्रेसने आपली भूमिका जाहीर करण्याचे आव्हान बुधवारी दिले. जर काँग्रेसला राममंदिर हवे असेल, तर त्यांनी कायदेशीर प्रक्रियेत अडथळे आणणे बंद करावे, अशी सूचना गोयल यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या वक्तव्यानंतर काँग्रसने जी लगेच प्रतिक्रिया दिली, हे शंकास्पद आहे आणि त्यांचेच काही साटेलोटे आहे की काय, असा सवाल गोयल यांनी केला. मोदींचाच पाकिस्तानला धाक आहे, असे स्पष्ट करीत गोयल यांनी दोन तृतीयांश बहुमत मिळवून मोदी सरकारच सत्तेवरच येईल, असा विश्वास व्यक्त केला.

महाराष्ट्रात भाजप शिवसेना सर्व ४८ जागाजिंकेल, असा निर्धार यशवंतराव चव्हाण सभागृहात पत्रकारांपुढे व्यक्त करताना गोयल म्हणाले, अयोध्येत राममंदिर होणारच आणि त्यासाठी सरकारने पावले टाकली आहेत. मंदिर हा आस्था व धर्माचा विषय असून काँग्रेसने तो पर्यटनाचा मुद्दा बनविला आहे.  समान नागरी कायद्याबाबतही आम्ही कटिबध्द आहोत. त्यादृष्टीने मुस्लिम महिलांना तोंडी तलाक देण्यास प्रतिबंध करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. काँग्रेसने देशद्रोही कारवायांविरोधात कारवाई करण्यासाठी असलेली कायदेशीर तरतूद काढून टाकण्याचे आश्वासन दिले आहे. काँग्रेसचे तंत्रज्ञानविषयक सल्लागार सॅम पित्रोदा यांची वक्तव्ये संतापजनक आहेत. मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याची घटना विसरता येणारी नाही. मुंबईकर जनतेने हल्ल्याचे परिणाम भोगले आहेत.

भारतीय अर्थव्यवस्था पुढील पाच वर्षांत पाच लाख कोटी रुपयांवर तर २०३२ पर्यंत १० वर्षांत १० लाख कोटी रुपयांवर जाईल, असे उद्दिष्ट असल्याचे सांगून गोयल यांनी पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये केंद्र सरकार सुमारे १०० लाख कोटी रुपये पाच वर्षांमध्ये गुंतविणार आहे, अशी माहिती दिली. गोयल यांच्या उपस्थितीत शिवा या वीरशैव लिंगायत समाजाच्या संघटनेचे संस्थापक प्रा मनोहर धोंडे यांनी भाजप-शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला. ‘जुन्या व्यवस्थांना हादरा देणारा देशाचा सर्जन‘ या डॉ आर बालशंकर यांच्या पुस्तकाच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन गोयल यांच्या हस्ते झाले.