राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या किमान समान कार्यक्रमात सावरकरांना भारतरत्न देणे किंवा औरंगाबाद शहराचे नामांतर करणे यांचा समावेश नाही, त्यामुळे काँग्रेस पक्षाचा त्याला पाठिंबा नाही, असे स्पष्टीकरण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी केला.

विधानसभेत बुधवारी राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शनाच्या ठरावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देणे, औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करणे आणि बाबरी मशीद पाडल्याचे विषय उपस्थित करून भाजपवर राजकीय कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेची हिंदुत्वाची भूमिकाही त्यांनी ठामपणे मांडली. त्यावर आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेल्या व सर्वधर्मसमभावाची भूमिका घेणाऱ्या काँग्रेसची भूमिका काय अशी चर्चा सुरू झाली.

या संदर्भात गुरुवारी विधानभवनात प्रस्तुत प्रतिनिधीने नाना पटोले यांना, सावरकरांना भारतरत्न देणे, औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामांतर करणे व बाबरी मशिदीबाबत मुख्यमंत्र्यांनी के लेल्या विधानावर काँग्रेसची भूमिका काय, असे विचारले असता, बाबरी मशिदीबाबत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेची भूमिका मांडली असे त्यांनी उत्तर दिले. सत्ताधारी महाविकास आघाडीमधील शिवसेनेने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न किताब देण्याचा विधिमंडळात ठराव मांडल्यास, जनभावना त्या बाजूने असेल तर काँग्रेसचा पाठिंबा राहील, असे त्यांनी सांगितले. औरंगाबादच्या नामांतराबाबतही काँग्रेसची तशीच भूमिका राहील असे त्यांनी म्हटले होते. मात्र ‘लोकसत्ता’मध्ये शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या या वृत्ताचा पटोले यांनी इन्कार केला आहे. ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झालेले हे वृत्त निराधार, असत्य आणि खोडसाळपणाचे असून लोकांची दिशाभूल करणारे आहे, असे पटोले यांनी स्पष्ट केले.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करते वेळी तीन पक्षांनी एकत्र बसून किमान समान कार्यक्रम तयार केला होता. या किमान समान कार्यक्रमानुसार राज्यातील सरकार काम करत आहे. या किमान समान कार्यक्रमात सावरकरांना भारतरत्न देणे किंवा औरंगाबाद शहराचे नामांतर करणे याचा समावेश नाही, त्यामुळे काँग्रेस पक्षाचा याला पाठिंबा नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.