दुष्काळाच्या तीव्र झळा बसत असताना पुरेसा निधी, गुरांना चारा मिळेल अशी खबरदारी घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने आपला बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात हक्काचे मतदार विरोधात जाणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेतली होती. आता काँग्रेससमोर मदतीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. कारण मित्र पक्ष आणि विरोधक असे दोघेही टपून बसलेले असताना अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या विदर्भ आणि कोकणातील शेतकऱ्यांच्या मदतीत काही हयगय झाल्यास त्याचा निवडणुकीत काँग्रेसला फटका बसू शकतो.
अतिवृष्टीमुळे विदर्भ आणि कोकणातील शेतीचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. विदर्भ हा काँग्रेसचा पारंपारिक बालेकिल्ला असल्याने या भागात सरकारच्या विरोधात नाराजी पसरणार नाही याची खबरदारी काँग्रेसला घ्यावी लागणार आहे. गेल्या हंगामात पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडय़ाला दुष्काळाचा फटका बसला होता. पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या होती. पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असून, मराठवाडय़ात पक्ष संघटना वाढविण्याकरिता राष्ट्रवादीने या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. दुष्काळाच्या तीव्रता जाणवत असताना मदतीसाठी पुरेसा निधी मिळेल याची खबरदारी राष्ट्रवादीने घेतली होती.
केंद्रीय मदतीच्या निर्णयाकरिता असलेल्या मंत्रिगटाचे अध्यक्षपद शरद पवार यांच्याकडे आहे. पवार यांनी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्राला जास्तीत जास्त मदत मिळेल याकडे स्वत: बारीक लक्ष दिले होते. केंद्र आणि राज्य सरकारने पुरेशी मदत केल्यानेच दुष्काळ तीव्र असताना सरकारच्या विरोधात एकही मोर्चा निघाला नव्हता याकडे शरद पवार यांनी लक्ष वेधले आहे. या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री चव्हाण यांना विदर्भातील शेतकऱ्यांना पुरेशी मदत मिळेल याबाबत पुढाकार घ्यावा लागणार आहे.
विदर्भातील दहापैकी आठ जागा काँग्रेस लढविते. गेल्या वेळी काँग्रेसचे चार खासदार निवडून आले होते. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जागा काँग्रेसकडेच आहेत. विदर्भात काँग्रेसला शह देण्याच्या उद्देशानेच राष्ट्रवादीने पाच जिल्हा परिषदांमध्ये भाजप-शिवसेनेशी हातमिळवणी केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडून नेहमीच केला जातो. पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवरच विदर्भातील शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे यावर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांनी भर देऊन वातावरण पेटविले आहे. आर्थिक मदतीत राष्ट्रवादीकडे असलेल्या वित्त खात्याकडून मोडता घातला जाण्याची भीती काँग्रेसच्या आमदारांना आहे.
चार खासदार आणि २४ आमदार निवडून आलेल्या काँग्रेसला विदर्भातील शेतकऱ्यांची नाराजी परवडणारी नाही. यामुळेच केंद्र सरकारने निकषात बदल करून राज्याला जास्तीत जास्त मदत द्यावी, असा आग्रह मुख्यमंत्री चव्हाण यांनी पंतप्रधानांकडे धरला आहे. निवडणुकीच्या तोंडावर विदर्भात निकष बदलून मदत दिली जावी, अशी काँग्रेस आमदारांची मागणी आहे.
अतिवृष्टीमुळे विदर्भ आणि कोकणातील शेतीचे  नुकसान झाले आहे. या भागात सरकारच्या विरोधात नाराजी पसरणार नाही याची खबरदारी काँग्रेसला घ्यावी लागणार आहे.

Chandrashekhar Bawankule,
“अपघाताच्या घटनेवरून राजकारण करणे चुकीचे”, बावनकुळेंनी काँग्रेसचे आरोप फेटाळले; म्हणाले, “महाराष्ट्रात घातपात…”
Shivsena, NCP, Mahavikas Aghadi,
महाविकास आघाडीत शिवसेना आणि राष्ट्रवादीचा वरचष्मा, काँग्रेसची फरफट, नाराजीची पटोलेंकडून कबुली
Bhiwandi lok sabha
भिवंडीत महाविकास आघाडीत बंडाचे वारे ? काँग्रेस लढण्यावर ठाम
Nana Patole
अशोक चव्हाणांचा महाराष्ट्रातून काँग्रेसला संपविण्याचा प्लॅन; नाना पटोलेंच्या गौप्यस्फोटाने खळबळ