मुंबई : ‘जिलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा‘ ही घोषणा देत गुजराती भाषकांना आपलेसे करण्यावर शिवसेनेने भर दिला असतानाच, उत्तर भारतीय  तसेच गुजराती मतदारांचा विश्वास संपादन करण्यावर काँग्रेसने भर दिला आहे. यासाठी दोन्ही समाजातील नेत्यांची घरवापसी करण्याची योजना मुंबई काँग्रेसचे नवे अध्यक्ष भाई जगताप यांनी आखली आहे.

उत्तर भारतीय, झोपडपट्टीवासीय हे काँग्रेसचे मुंबईत पारंपारिक मतदार होते. परंतु २०१४च्या निवडणुकीपासून हे पारंपारिक मतदार भाजपकडे वळले. परिणामी काँग्रेसची मुंबईत पिछेहाट झाली. काँग्रेसचे हक्काची मतपेढी भाजपकडे वळली.गुजराती भाषिक मतदारांनीही काँग्रेसकडे पाठ फिरविली. मराठी मते मुख्यत्वे शिवसेनेला मिळतात. काँग्रेसची भिस्त ही अन्य भाषिक व अल्पसंख्याक मतदारांवर होती. उत्तर भारतीय तसेच झोपडपट्टीवासियांची पारंपारिक मते पुन्हा काँग्रेसला मिळावीत म्हणून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.

पुढील वर्षी होणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाई जगताप यांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. उत्तर भारतीय ही काँग्रेसची पारंपारिक मतपेढी. मुंबईतील उत्तर भारतीयांचा विश्वास संपादन करण्यासाठी आतापासूनच पावले उचलण्यात येत आहेत. पक्ष सोडून गेलेल्या उत्तर भारतीय समाजातील नेत्यांना पुन्हा पक्षात दाखल करून घेण्यात येणार आहे. काही नेत्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये येण्याची इच्छाही प्रदर्शित के ल्याचे जगताप यांनी सांगितले.

महिला प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदी संध्या सवालाखे यांची नियुक्ती

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी यवतमाळच्या संध्या सवालाखे यांची मंगळवारी नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीमुळे हे पद विदर्भाकडेच कायम राहिले. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या प्रभा राव यांची कन्या चारुलता टोकस यांच्या जागी महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी सवालाखे यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचे काँग्रेस सरचिटणीस वेणूगोपाळ यांनी जाहीर केले. सवालाखे या यवतमाळ जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आहेत.  गेल्याच महिन्यात मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी भाई जगताप यांची नियुक्ती करण्यात आली होती. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या जागी नवा अध्यक्ष नेमण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. गेल्याच आठवडय़ात राज्याचे प्रभारी एच. के.पाटील यांनी मुंबईत पक्षाचे आमदार व पदाधिकाऱ्यांकडून नव्या अध्यक्षांच्या नावाबाबत चाचपणी केली होती.