भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची घोषणा

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत ‘कॉंग्रेसमुक्त महाराष्ट्र’ हेच आपले पहिले ध्येय आहे, असे जाहीर करीत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. युतीच्या २२० हून अधिक जागा निवडून आणण्यासाठी भाजपबरोबरच शिवसेना व मित्र पक्षाच्या उमेदवारांसाठी काम करायचे असून त्यासाठी सर्व २८८ मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांनी तयारी करावी, असे आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी केले.

चंद्रकांत पाटील यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी तर आमदार मंगलप्रभात लोढा यांची मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. भाजपच्या प्रदेश मुख्यालयात बुधवारी दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चंद्रकांत पाटील यांनी पदभार स्वीकारला. यावेळी चंद्रकांत पाटील यांच्याबरोबरच मंगलप्रभात लोढा यांचाही सत्कार झाला. चंद्रकांत पाटील हे गेली पावणेपाच वर्षे मंत्री असले तरी त्यांचा मूळ पिंड संघटनेचा आहे. विद्यार्थी परिषदेचे महाराष्ट्रात आणि राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व त्यांनी केले. भाजपसाठी संघटनेचे काम केले. मंत्रिपदाच्या काळातही संघटनेसाठी ते कार्यरत राहिले. आता त्यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देऊन केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्या क्षमतेवर विश्वास दाखवला आहे. भाजपमध्ये सामूहिक नेतृत्व असते. प्रदेशाध्यक्षालाही मोठे महत्त्व असते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आपण सर्व जण मिळून पक्षाला विजयी करू, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

त्यानंतर पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून आपल्या योजनांबाबत भाष्य केले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांना मिळालेले मताधिक्य पाहता, विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांचा पराभव करू असे म्हणायला आम्ही काही दिवास्वप्ने पाहत नाही. वास्तवात जगतो. राहुल गांधी यांच्याविरोधात प्रथम पराभव झाल्यानंतर स्मृती इराणी अमेठीला जात राहिल्या आणि २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी राहुल यांचा पराभव केला. त्याचप्रमाणे आम्ही बारामतीला जात राहू आणि २०२४ मध्ये बारामती जिंकू, असा निर्धार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

विधानसभा निवडणुकीत युतीचे जागावाटप, मुख्यमंत्रिपद याबाबत राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झालेली आहे. युतीमध्ये इतरही पक्ष आहेत. त्यांनाही जनाधार आहे. त्यामुळे घटक पक्षांना जागावाटपात सोबत घ्यायचे आहे, याची जाणीव शहा आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना दिली आहे. त्यामुळे हे तिघे मिळूनच निर्णय घेतील, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

‘मी कोऱ्या पाकिटासारखा’ : प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने मंत्रीपद सोडणार का, विधानसभा लढवणार का, भविष्यातील जबाबदाऱ्या याबाबत प्रश्न विचारले असता, मी कोऱ्या पाकिटासारखा आहे. आपण कुठे जायचे हे ठरवण्याचा अधिकार कोऱ्या पाकिटाला नसतो. मालक ठरवतो ते पाकीट कुठे पाठवायचे ते. त्याचप्रमाणे मी काय करायचे ते केंद्रीय नेतृत्व ठरवेल आणि माझ्या पाकिटावर लिहितील आणि ते जे लिहितील त्याप्रमाणे मी काम करेन, असे उत्तर चंद्रकांत पाटील यांनी दिले.

इतर पक्षातील नेत्यांना भाजपत आणणार

भाजप मजूबत करण्याचे, युतीमधील सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचे आणि त्याचबरोबर इतर पक्षातील नेत्यांना भाजपमध्ये आणण्याचे काम करू. अनेकांना भाजपमध्ये यायचे आहे, असे सूचक उद्गारही चंद्रकांत पाटील यांनी काढले.