राष्ट्रवादीच्या भाजपबरोबरील वाढत्या जवळिकीबद्दल टीका होऊ लागल्याच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी विविध मुद्दय़ांवरून काँग्रेसची बाजू उचलून धरत काँग्रेसच्याच नेत्यांना बुचकळ्यात टाकले. वांद्रे पूर्वमधील उमेदवार नारायण राणे यांना शुभेच्छा देत या पोटनिवडणुकीच्या निकालापासून राजकीय बदलांची सुरुवात होईल, असा अंदाजही व्यक्त केला.
वांद्रे पूर्व मतदारसंघातील उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ पवार यांची जाहीर सभा झाली. या सभेत पवार यांनी राणे यांचे कौतुक केले. आघाडी तुटल्यानंतर शरद पवार प्रथमच काँग्रेसच्या व्यासपीठावर उपस्थित राहिले. सोनिया गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधाने करणारे केंद्रीय राज्यमंत्री गिरिराज सिंग यांच्यावर पवार यांनी टीका केली.
काँग्रेससमवेत आमचे मतभेद झाले असले तरी देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या नेत्यांनी काँग्रेस घडविली. काँग्रेसमुक्त भारत ही भाजपच्या घोषणेबद्दल पवार यांनी भाजप नेत्यांवर टीका केली. मोदी यांच्याकडून देशवासीयांच्या मोठय़ा अपेक्षा होत्या, पण त्यांची सुरुवात चांगल्या विचारांनी झालेली नाही, असेही पवार यांनी सांगितले. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर युतीत बिघाडी होईल आणि राज्य सरकार कोसळेल. तसेच दोन-अडीच वर्षांत मध्यावधी निवडणुका होतील, असा अंदाजही पवार यांनी व्यक्त केला.