मुंबई महापालिकेच्या एम-पश्चिम प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस नगरसेवकाने भाजप उमेदवाराच्या पारडय़ात मत टाकले. पालिका सभागृहात गोंधळ घालून सत्ताधारी शिवसेना-भाजपला अडचणीत आणणाऱ्या काँग्रेसला आपल्याच नगरसेवकामुळे पराभव पत्करावा लागला. या नगरसेवकाविरुद्ध कारवाई करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे; तर काही प्रभाग समित्यांमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसने मनसेला मतदान करीत शिवसेनेला पराभवाची धूळ चारली.
एम-पश्चिम प्रभाग समितीमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे संख्याबळ समसमान आहे. शिवसेना-भाजपचे चार, तर काँग्रेसचे ४ नगरसेवक या प्रभागात आहेत. या प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी भाजपने महादेव शिगवण यांना, तर काँग्रेसने वंदना साबळे यांना उमेदवारी दिली होती. मतदानाच्या वेळी काँग्रेसचे नगरसेवक अनिल पाटणकर यांनी महादेव शिगवण यांना मतदान केले. त्यामुळे वंदना साबळे यांना पराभव पत्करावा लागला. दोन्ही उमेदवारांना समसमान मते मिळाली असती तर चिठ्ठी टाकून अध्यक्ष निवडावा लागला असता. अनिल पाटणकर यांनी भाजपला मतदान केल्यामुळे काँग्रेसला धक्का बसला आहे.  पाटणकर यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी माजी नगरसेवक गौतम साबळे यांनी केली आहे.
एम-पश्चिमसह आठ प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदाची निवडणूक मंगळवारी पार पडली. दादर जी-उत्तर प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मनसेच्या उमेदवार श्रद्धा पाटील यांचा अर्ज सादर झाला होता. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली. एच-पूर्व आणि एच-पश्चिम प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मनसेचा गीता चव्हाण, के-पूर्व प्रभाग समितीत शिवसेना-भाजप युतीच्या मंजिरी परब, के-पश्चिममध्ये शिवसेना-भाजपच्या भावना मांगेला विजयी झाल्या. एलमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवार सविता पवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने अपक्ष उमेदवार नगरसेविका लीना शुक्ला यांना विजयी घोषित करण्यात आले. एन प्रभाग समितीमध्ये राष्ट्रवादीच्या तर, काँग्रेसच्या एका नगरसेवकाने मतदान केल्यामुळे मनसेचे सुरेश आवळे वियजी झाले.