नगरपालिका निवडणुकांसाठी काँग्रेसमध्ये उमेदवारांचा दुष्काळ असला तरी औरंगाबाद महापालिकेसाठी मात्र उमेदवारीवरून बरीच चढाओढ झाली आहे. यामुळेच उमेदवारांची नावे निश्चित करण्याची प्रक्रिया शुक्रवारी लांबणीवर टाकावी लागली.
औरंगाबाद आणि नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे निश्चित करण्याकरिता प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस संसदीय मंडळाची बैठक पार पडली. औरंगाबादमध्ये १११ जागांसाठी ६०० पेक्षा जास्त अर्ज दाखल झाले आहेत. काही प्रभागांमधील उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली असली तरी यादी शेवटच्या क्षणी जाहीर केली जाणार आहे. मुस्लीमबहुल प्रभागांमध्ये उमेदवारीवरून बरीच चढाओढ आहे. या प्रभागांमध्ये कोणाला उमेदवारी द्यायची यावरून स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये वादावादी झाली. एमआयएमने विधानसभा निवडणुकीच्या वेळी औरंगाबागदमध्ये आव्हान उभे केले होते. शहरात एमआयएमचा एक आमदार निवडून आला तर अन्य एका मतदारसंघात पक्षाचा उमेदवार थोडय़ा मतांनी पराभूत झाला होता. या वेळी मात्र एमआयएमचा तेवढा प्रभाव नसल्याचे सांगण्यात येते. वांद्रे पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीत एमआयएमला अपेक्षित यश न मिळाल्यास त्याचा औरंगाबादमधील मुस्लीम मतांवर परिणाम होऊ शकतो.  
औरंगाबादमध्ये स्थानिक काँग्रेस नेत्यांचा राष्ट्रवादीशी आघाडी करण्यास विरोध आहे. स्थानिक नेत्यांची इच्छा नसल्यास आघाडी केली जाणार नाही, असे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.