पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपबद्दलची नाराजी मतदारांनी स्पष्टपणे व्यक्त केली आहे. भाजपला पर्याय म्हणून काँग्रेस उभा ठाकला आहे. त्यामुळे सार्वत्रिक निवडणुकांनंतर राजकीय चित्र बदलेल, असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी येथे केले.

काँग्रेसने नवीन पिढीकडे नेतृत्व सोपवले. ते लोकांनी मान्य केले आहे. सार्वत्रिक निवडणुकीत तिसरी आघाडी किंवा यूपीए ३ असे काही नसेल. मात्र देशपातळीवरील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आपापसातील मतभेद विसरून सर्वानी एकत्र आले पाहिजे, अशी अपेक्षाही पवार यांनी व्यक्त केली.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात पवार यांनी कार्यकर्ते, नेते, विविध क्षेत्रांतील मान्यवर यांच्या उपस्थितीत साधेपणाने आपला ७८ वा वाढदिवस साजरा केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांनी पवार यांची भेट घेऊन अभिष्टचिंतन केले.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांविषयी पवार म्हणाले की, मतदारांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केल्याचे दिसते. मतदारांचा कौल पाहता भाजप सोडून इतर पक्षांमध्ये समाधान आहे. भाजपला काँग्रेस हा महत्त्वाचा पर्याय आहे. ज्या-ज्या वेळी निवडणुका होतील त्या वेळी मतदार चित्र बदलतील.

सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेतली, रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरांनी राजीनामा दिला, सीबीआयमधील वाद चव्हाटय़ावर आला. दिलेली आश्वासने पंतप्रधान या निवडणुकीत विसरले आणि फक्त एका कुटुंबाबद्दल बोलत राहिले. ज्यांनी पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांना पाहिले नाही, तरीही ते एका कुटुंबावर हल्ला करत राहिले. त्याचा परिणाम निवडणूक निकालातून दिसला, असे पवार म्हणाले.

अभीष्टचिंतनासाठी गर्दी..

शरद पवार यांना ७८ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली. राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने वाढदिवस साजरा करणार नाही, असे पवार यांनी जाहीर केले होते. फक्त शुभेच्छा स्वीकारण्यासाठी ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आले होते. कार्यकर्त्यांनी आणलेले पुष्पगुच्छ किंवा पुष्पहार बाहेरच काढून घेतले जात होते. कार्यकर्ते सभागृहात जाऊन पवारांशी हस्तांदोलन करून शुभेच्छा देत होते. पवार यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, दिलीप वळसे-पाटील, विजयसिंह मोहिते-पाटील, धनंजय मुंडे, नवाब मलिक आदी नेते उपस्थित होते.