निवडणुकीचा अद्याप प्रस्ताव नाही; राष्ट्रवादी व भाजपच्या खेळीकडे लक्ष

विधान परिषदेचे उपसभापतिपद काँग्रेसला देण्याचा शब्द राष्ट्रवादीने दिला असला तरी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवडय़ात या संदर्भात हालचाली झाल्या नाहीत. हे पद मिळावे म्हणून भाजपचे प्रयत्न सुरू असून, यामुळेच बहुधा संसदीय कार्य विभागाकडून अद्याप प्रस्तावच सादर करण्यात आलेला नाही.

विधान परिषदेच्या दोन जागांवर पाठिंबा देण्याच्या बदल्यात उपसभापतिपद काँग्रेसला देण्यात येईल, असे राष्ट्रवादीने जाहीर केले होते.  अधिवेशनाच्या पहिल्या आठवडय़ात ही निवडणूक घेण्यात येईल, असे राष्ट्रवादीच्या वतीने काँग्रेसला आश्वस्त करण्यात आले होते. पण पहिल्या आठवडय़ात सभापती कार्यालय किंवा संसदीय कार्य विभागाकडून उपसभापतिपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याकरिता काहीच हालचाली झालेल्या नाहीत.

काँग्रेसला उपसभापतिपद मिळू नये, असा भाजपचा प्रयत्न आहे. या पदावर भाजपचा डोळा आहे. राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येऊन काँग्रेसचा दावा हाणून पाडू शकतात. गेल्याच वर्षी तत्कालीन सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याविरुद्ध अविश्वासाचा ठराव मंजूर करण्याकरिता भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आले होते याकडे काँग्रेसचे नेते लक्ष वेधत आहेत. दोन जागांवर पाठिंबा मिळविण्याकरिता उपसभापतिपद देण्याचे आश्वासन राष्ट्रवादीच्या केंद्रीय नेत्यांनी काँग्रेसच्या दिल्लीतील नेतृत्वाला दिले आहे, असे काँग्रेसच्या नेत्यांकडून सांगण्यात आले. दुसऱ्या आठवडय़ात तरी उपसभापतिपदाची निवडणूक व्हावी, अशी काँग्रेसची मागणी आहे.

उपाध्यक्षपदही रिक्त

विधानसेभेचे उपाध्यक्षपदही रिक्त आहे. शिवसेनेचा या पदावर डोळा असला तरी हे पद भाजप स्वत:कडेच ठेवणार आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारात संधी मिळणार नाही त्यांची उपाध्यक्षपदी वर्णी लावण्याची भाजपची योजना आहे.

योगेश सागर यांच्यावर विरोधक संतप्त

भाजपचे विधानसभा अध्यक्षपदाच्या तालिकेवरील सदस्य योगेश सागर यांच्या कार्यपद्धतीवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते संतप्त झाले आहेत. अध्यक्षपदी बसल्यावर ज्या पद्धतीने ते बोलतात ते योग्य नाही, असा विरोधकांचा आक्षेप आहे. योगेश सागर यांच्यावर बहिष्कार घालण्याची काँग्रेस व राष्ट्रवादीची योजना आहे.