05 March 2021

News Flash

राष्ट्रवादीच्या जागांवर काँग्रेसचा डोळा !

काँग्रेसबरोबर आघाडी कायम ठेवताना गेल्या वेळी लढलेल्या २२ मतदारसंघांची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केली असतानाच काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांना मात्र गेल्या वेळचे जागावाटप मान्य नाही. राष्ट्रवादीचे

| June 24, 2013 05:58 am

काँग्रेसबरोबर आघाडी कायम ठेवताना गेल्या वेळी लढलेल्या २२ मतदारसंघांची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केली असतानाच काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांना मात्र गेल्या वेळचे जागावाटप मान्य नाही. राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता नसलेले काही मतदारसंघ काँग्रेसला मिळाले पाहिजेत, अशी भूमिका राज्यातील नेत्यांनी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे मांडली.
सरचिटणीसपदी बढती आणि महाराष्ट्राचे प्रभारीपद कायम राहिलेल्या मोहन प्रकाश यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर दोन दिवसांच्या मुंबई भेटीत राज्यातील नेत्यांकडून मतदारसंघ व आघाडीबाबतचा आढावा घेतला. काँग्रेसने गेल्या वेळी लढविलेल्या २६ जागांचा आढावा घेतानाच आघाडीत राष्ट्रवादीबरोबर जागांची आदलाबदल करता येईल का, याबाबतही माहिती घेतल्याचे सांगण्यात आले. गेल्या वेळी काँग्रेस-राष्ट्रवादीत २६-२२ जागांचे वाटप झाले असले तरी एवढय़ा जागा राष्ट्रवादीला सोडण्यास काँग्रेसच्या नेत्यांनी विरोध दर्शविला. गेल्या वेळी राष्ट्रवादीच्या ताब्यातील विदर्भ आणि मराठवाडय़ाील मतदारसंघ काँग्रेसला मिळाले पाहिजेत अशी प्रदेश काँग्रेसची भूमिका असल्याचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.
मराठवाडय़ातील उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीचे डॉ. पद्मसिंह पाटील हे गेल्या वेळी निवडून आले होते. त्यामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे राहणार आहे. हिंगोली आणि परभणी हे मराठवाडय़ातील दोन मतदारसंघ मिळावेत, अशी काँग्रेस नेत्यांची भूमिका आहे. या दोन्ही मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येऊ शकत नाहीत, असे काँग्रेसचे गणित आहे.
विदर्भातील भंडारा-गोंदिया मतदारसंघातून गेल्या वेळी प्रफुल्ल पटेल हे निवडून आले होते. परंतु अमरावती आणि बुलढाणा या दोन्ही मतदारसंघांमध्ये काँग्रेसचेच उमेदवार निवडून येऊ शकतात, असे राज्यातील काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. अमरावती जिल्ह्य़ात काँग्रेसचे चार आमदार आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये काँग्रेसचे जास्त सदस्य आहेत. बुलढाणा जिल्ह्य़ातही काँग्रेस राष्ट्रवादीपेक्षा फार पुढे असल्याचा दावा करण्यात येतो.
राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची एकूणच राजकीय ताकद लक्षात घेता आघाडीत राष्ट्रवादीला जास्त जागा सोडणे योग्य ठरणार नाही, याकडेही राज्यातील नेत्यांनी मोहन प्रकाश यांचे लक्ष वेधले. गेल्या वेळी राष्ट्रवादीचे पश्चिम महाराष्ट्रातून तीन जण निवडून आले होते. तर उर्वरित पाच महसुली विभागांमधून प्रत्येकी एक खासदार निवडून आला होता. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर मोहन प्रकाश हे आघाडी आणि जागावाटपाबाबत नवी दिल्लीत पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा करणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2013 5:58 am

Web Title: congress keeps an eye on ncp seats
टॅग : Congress,Election,Ncp,Seats
Next Stories
1 बॉम्बच्या अफवेने विमानाचे ‘इमर्जन्सी लँडिंग’
2 अपघातांमधील मृत्यूदर कमी करण्यावर भर राज्यभर
3 मुंबईतील एलबीटी आकारणी अधांतरीच
Just Now!
X