पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याने या भागाकडे काँग्रेसने दुर्लक्ष केले असले तरी विदर्भात राष्ट्रवादीने काँग्रेसला रोखण्याचा प्रयत्न सुरू केल्याने त्याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसने आता पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केले आहे. यातूनच पुणे आणि सातारा परिसरात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या दौऱ्यांमध्ये वाढ झाली आहे.
राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर पश्चिम महाराष्ट्रावर राष्ट्रवादीचा पगडा राहिला. तरीही सांगली, नगर व सोलापूर जिल्ह्यांमध्ये काँग्रेसने आपले अस्तित्व कायम ठेवले. पश्चिम महाराष्ट्राची जहागिरी राष्ट्रवादीकडे सोपविल्यासारखेच काँग्रेसने या भागात फारसे लक्ष घातले नाही. राज्यात राष्ट्रवादीला रोखायचे असल्यास त्याची सुरुवात पश्चिम महाराष्ट्रापासून झाली पाहिजे, असा काँग्रेसमध्ये मतप्रवाह आहे. विदर्भात काँग्रेसला रोखण्याकरिता राष्ट्रवादीने पद्धतशीरपणे भाजपशी हातमिळवणी केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे नेहमीच करतात. राष्ट्रवादीला जशास तसे उत्तर देण्याकरिताच काँग्रेसने पश्चिम महाराष्ट्रात लक्ष घातले आहे.
पुणे लोकसभेची जागा कायम राखण्याचे काँग्रेसपुढे आव्हान आहे. राष्ट्रकुल घोटाळ्यामुळे सुरेश कलमाडी यांना पुन्हा उमेदवारी मिळणार नाही. परिणामी काँग्रेस नव्या उमेदवाराच्या शोधात आहे. पुणे शहरातही राष्ट्रवादीने ताकद वाढविण्याचा प्रयत्न सुरू केल्याने काँग्रेसमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यातूनच मुख्यमंत्री चव्हाण यांनी पुण्यावर भर दिला आहे. गेल्या सहा महिन्यांत मुख्यमंत्र्यांच्या पुण्यातील दौऱ्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. दर महिन्यात मुख्यमंत्र्यांचे तीन ते चार पुणे दौरे होऊ लागले आहेत. बारीक सारीक कार्यक्रम मुख्यमंत्र्यांकडून स्वीकारले जातात.
पुण्यातील मुख्यमंत्र्यांचे दौरे वाढल्याबद्दल मध्यंतरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेरेबाजी केली होती. तसेच काँग्रेसची राज्यस्तरीय शिबिरेही अलीकडे पुण्यातच आयोजित केली जातात. नगरमध्ये बाळासाहेब थोरात व राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राष्ट्रवादीला मोकळे रान मिळणार नाही याची खबरदारी घेतली आहे.
सांगलीमध्ये डॉ. पतंगराव कदम, प्रतिक पाटील, मदन पाटील आदी मंडळी जयंत पाटील वा आर. आर. पाटील यांना पुरून उरले. सोलापूरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी समसमान आहेत. पुणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग आणि सातारा जिल्ह्यांमध्ये खड्डा पडला होता. सातारा हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असला तरी काँग्रेसचे विलासकाका पाटील-उंडाळकर हे एकमेव आमदार निवडून येतात. त्यातही विलासकाका स्वत:च्या ताकदीवर निवडून येतात. आगामी विधानसभा निवडणूक लढण्याचे संकेत मुख्यमंत्री चव्हाण यांनी दिल्याने साताऱ्यावर जास्त लक्ष केंद्रित करणे ओघानेच आले.
खासदारांचे संख्याबळ वाढविण्यावर भर
नगर आणि शिर्डीसह राजकीयदृष्टय़ा पश्चिम महाराष्ट्रात लोकसभेचे १२ मतदारसंघ आहेत. गेल्या वेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रत्येकी तीन खासदार निवडून आले होते. यंदा मावळ, नगर, शिरुर हे मतदारसंघ जिंकण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असतानाच काँग्रेसने शिर्डी, कोल्हापूर हे दोन मतदारसंघ जिंकण्याचा निर्धार केला आहे.