काँग्रेस नेते आनंद शर्मा यांचा मोदी, फडणवीसांना सल्ला

मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतील प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे नेते भावनिक मुद्दे काढून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत, हिम्मत असेल तर त्यांनी देशाची बिघडलेली अर्थव्यस्था, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलावे, असे आव्हान काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी दिले.

पंतप्रधान मोदी यांना इतिहास, घटनाक्रम व अर्थव्यवस्था या गोष्टीचे कसलेही ज्ञान नाही, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, तर इतिहासाचे पुनर्लेखन करायला निघालेले आहेत, परंतु इतिहास हा इतिहास असतो, तो बदलला जात नाही, असा टोला शर्मा यांनी हाणला.

मुंबईत काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी शुक्रवारी आनंद शर्मा आले होते. त्या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी, केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केला. या वेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, उपाध्यक्ष चरणसिंह सप्रा, माजी मंत्री सुरेश शेट्टी, प्रवक्ते डॉ.  राजू वाघमारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

शर्मा म्हणाले की, देशातील आणि महाराष्ट्रातील अनेक उद्योगधंदे बंद पडले आहेत, गेल्या पाच वर्षांत कोणतीही नवीन मोठी गुंतवणूक नाही, नवीन कारखाने उभे राहिले नाहीत, नवीन उत्पादन नाही, उत्पादन क्षमता शून्याच्या खाली गेली आहे. नोटाबंदी व जीएसटीमुळे देशावर आर्थिक संकट निर्माण झालेले आहे. भाजप सरकारकडे यासाठी कोणतीच उपाययोजना नाही.

केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात २४ लाख कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित आहे. परंतु सप्टेंबपर्यंत सात लाख कोटी रुपयांची महसुलात घट झालेली आहे. आता उरलेल्या सहा महिन्यांत १७ लाख रुपये कसे जमा करणार, हा प्रश्न आहे. भाजप सरकारने १० लाख कोटी रुपये जीएसटीचा परतावा दिलेला नाही. त्यावर काही बोलण्याऐवजी पंतप्रधान व अर्थमंत्री स्वप्नाच्या दुनियेत वावरत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

पंतप्रधान मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ज्या हक्काने रिझव्‍‌र्ह बँकेकडून पैसे घेतले त्याच हक्काने पीएमसी बँकेतील १६ लाख खातेधारकांचे पैसे त्यांना परत देण्याचा निर्णय का घेत नाहीत, असा सवाल शर्मा यांनी केला.

पीएमसी बँकेच्या खातेधारकांना त्यांनी लवकरात लवकर दिलासा दिलाच पाहिजे. त्यांचे ते स्वत:च्या मेहनतीचे पैसे आहेत. काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी आहे, असे त्यांनी सांगितले.