News Flash

कामत काँग्रेसबाहेर

कामत यांनी पक्षाचे नेते आणि समर्थकांना पाठविलेल्या संदेशात राजकारणातून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले.

Congress corporators, Mumbai, BMC, Gurudas kamat, Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
Gurudas kamat : मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम आणि कामत गटात गेल्या काही दिवसांत वितुष्ट असल्याचे दिसून आले होते.

मुंबई पक्ष संघटनेत दुय्यम स्थान मिळाल्याने राजकारण संन्यास?

छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांनी काँग्रेसला रामराम करून धक्का दिल्याच्या पाठोपाठच पक्षाचे सरचिटणीस गुरुदास कामत यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचे जाहीर केल्याने काँग्रेसला गळती लागण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे मानले जात आहे. मुंबईच्या संदर्भात राहुल गांधी यांनी संजय निरुपम यांना झुकते माप दिल्याने कामत अस्वस्थ झाले होते. राहुल यांच्या विरोधात असलेले नेते पक्ष सोडू लागल्याचे चित्र आता समोर येऊ लागले आहे.

कामत यांनी पक्षाचे नेते आणि समर्थकांना पाठविलेल्या संदेशात राजकारणातून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले आहे. दहा दिवसांपूर्वी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन राजीनाम्याचा मनोदय

व्यक्त केला होता. तसेच सोनिया आणि राहुल गांधी यांना या संदर्भात पत्रही लिहिले होते. उभयतांकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने राजकारणातून निवृत्त पत्करत असल्याचे कामत यांनी जाहीर केले आहे.

राजीनाम्याची परंपराच

कामत यांनी ज्या ज्या पदांवर काम केले त्या पदांचा त्यांनी राजीनामा दिला. केंद्रीय मंत्रिमंडळात पाणी पुरवठा आणि स्वच्छता या खात्याचा स्वतंत्र कार्यभार दिल्याच्या निषेधार्थ त्यांनी राजीनामा दिला होता. मुंबई काँग्रेस, अ. भा. युवक काँग्रेस वा प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्षपदाचा त्यांनी राजीनामा दिला आहे.

यामुळे कामत आणि  राजीनामा नवीन नाही, अशी पक्षात प्रतिक्रिया आहे. गुजरात आणि राजस्थानमध्ये मेहनत घेत असल्याने राज्यसभेची खासदारकी मिळावी, अशी त्यांची इच्छा होती. पी. चिदम्बरम यांना पक्षाने संधी दिल्याने नाराजीचे हे कारण असल्याचे सांगण्यात आले.

कामत मुंबईत काँग्रेसला सतावणार ?

गुरुदास कामत यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली तरी ते अन्य कोणत्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता दिसत नाही. मात्र मुंबईत काँग्रेसला अपशकून करण्याची शक्यता नाकारता येत नाही. माजी खासदार प्रिया दत्त यांच्या मातोश्रीच्या फेऱ्या वाढल्या आहेत. मुंबई काँग्रेसमध्ये कामत यांना मानणारा मोठा वर्ग आहे. कामत काँग्रेसला घरबसल्या त्रास देऊ शकतात.

कामत का रुसले ?

ल्ल गुरुदास कामत हे सध्या काँग्रेसचे सरचिटणीस असून ते गुजरात, राजस्थान, दादरा नगर हवेली आणि दीव व दमण या राज्यांचे प्रभारी होते. अलीकडेच गुजरातमध्ये झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी भाजपचा काँग्रेसने पराभव केला होता.

ल्ल बहुतांशी जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसला सत्ता मिळाली. या विजयाचे श्रेय पक्षाने गुरुदास कामत यांना दिले होते. गुजरात किंवा राजस्थानमध्ये पक्ष वाढीसाठी प्रयत्न करीत असताना कर्मभूमी असलेल्या मुंबईत पक्षाकडून दुर्लक्ष केले जात असल्याची कामत यांची भावना झाली होती.

ल्ल मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांना पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी झुकते माप दिले. निरुपम यांच्या विनंतीवरून राहुल यांनी लागोपाठ दोन मुंबईचे दौरे केले. निरुपम यांनी कामत समर्थकांचे पत्ते कापण्यास सुरुवात केली.

ल्ल मुंबई महापालिकेतील पक्षाच्या गटनेत्याला हटविले. अन्य काही कामत समर्थक पदाधिकाऱ्यांना दूर केले. यातून आगामी महापालिका निवडणुकीत आपल्याला फार काही महत्त्व मिळणार नाही किंवा समर्थकांना उमेदवारी देणे शक्य होणार नाही हे कामत यांच्या लक्षात आले होते. यामुळेच कामत रुसल्याचे समजते.

राहुल विरोधातील नेते बाहेर पडू लागले ?

अजित जोगी यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करून पक्षाला रामराम ठोकला आणि आजच प्रादेशिक पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली. यापाठोपाठ कामत हे पक्षातून बाहेर पडले आहेत. त्यांचा सारा रोख हा राहुल यांच्यावरच आहे. राहुल यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला चांगले दिवस येण्याची शक्यता कमी वाटत असल्याने नेते बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे मानले जाते. गळती आणखीही होऊ शकते. राहुल गांधी यांच्याकडे पक्षाची सूत्रे सोपवून त्यांच्या कलाने पक्षाचा कारभार करण्यास संधी द्यावी, असाच पक्षात मतप्रवाह आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2016 3:47 am

Web Title: congress leader gurudas kamat left politics forever 2
Next Stories
1 ठाणे ते डोंबिवली आता पुन्हा १४ मिनिटांत!
2 दोन महिन्यांत दहा हजार फेऱ्यांवर दिरंगाईचे विघ्न!
3 लोकलमध्ये महिलांकडून पॅनिक बटणाचा गैरवापर?
Just Now!
X