कन्हैया कुमारची भाजपवर टीका

औरंगाबाद : मंदिर-मस्जिद, काश्मीर, गाय, शहराचे नामकरण, असे अस्मितेचे मुद्दे एका बाजूला ज्याचा सर्वसामान्यांच्या दैनंदिन जगण्याशी काहीही संबंध नाही. असे का, कारण बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, पाणी-कचरा, खड्डेमय रस्ते, या मुख्य विषयांवरून लक्ष हटवणे हे भाजपच्या राजकारणाचा एक भाग राहिलेला आहे, अशा शब्दात दिल्लीतील विद्यार्थी नेते कन्हैया कुमार यांनी भाजपच्या प्रचारप्रणालीवर टीका केली.

निवडणुकीत राजकारणाची मूळ मूल्ये पुनप्र्रस्थापित करण्याची गरज व्यक्त करताना मतदारांनी कुठल्याही प्रलोभनांना बळी पडू नये, धर्म-जात या तात्कालिक भावनेत अडकून पडल्यानंतर हाती पश्चात्तापाशिवाय काहीही येणार नसून नोकरीसह इतरही सोयीसुविधा मिळणार नाहीत, याची मानसिक तयारीही ठेवावी, असेही तो मतदारांना उद्देशून म्हणाला.

डाव्या लोकशाही आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. अभय टाकसाळ यांच्या प्रचारार्थ गुरुवारी रात्री आमखास मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होता. कन्हैया कुमार म्हणाले,की जिंकणाऱ्यालाच मत द्यावे, अशी मानसिकता करून भाजप दूरचित्रवाहिनीवरील जाहिरातीतील खोटय़ा दाव्याप्रमाणे प्रचारतंत्र अवलंबत आहे. जाहिरातीतील वस्तू या केलेल्या दाव्याला खऱ्या उतरत नसतात. फक्त पुन्हा-पुन्हा त्याचा पुनरुच्चार केल्याने तेच खरे भासायला लागते. भाजपकडूनही सध्या तेच अजिंक्य आहेत, असा दावा केला जात असून तसे असेल तर निवडणुकाच कशाला घेता, असा प्रश्नही कन्हैया कुमारने उपस्थित केला. डावी आघाडी संपल्यात जमा आहे, असा अपप्रचार केला जात असल्याचे सांगताना आमचे लोक संपणार नाहीत, ते कालही लढत होते, उद्याही लढतील, असे सांगितले. कुमारने संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात १०५ हुताम्यांपैकी ८० हुतात्मे हे डाव्या चळवळीतील होते, असेही सांगितले.

दहा रुपयात थाळी देतील, पण सात रुपये शौचासाठी आकारून तुमच्या खिशातून ते काढून घेतील, अशा शब्दात कुमारने शिवसेनेच्या आश्वासनाची खिल्ली उडवली. औरंगाबादच्या नागरिकांना सामना कराव्या लागणाऱ्या पाणी, कुत्रे, कचरा, खड्डेमय रस्ते या प्रश्नावरूनही स्थानिक प्रशासनाला त्याने लक्ष्य केले. उमेदवार अ‍ॅड. टाकसाळ यांनीही शहराचे प्रश्न मांडले. गतवर्षीच्या दंगलीत मृत्यू पावलेल्या दोन्ही धर्मातील पीडितांची भेट घेऊन त्यांचा लढा लढत असल्याचे सांगितले. व्यासपीठावर अ‍ॅड. मनोहर टाकसाळ, प्रा. राम बाहेती, सुभाष लोमटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

‘भारतरत्न’वरून टीका : ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ देण्याच्या भाजपच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर टीका केली. कन्हैयाकुमार म्हणाले, सावरकर यांना ‘भारतरत्न’  देणार असाल तर देशासाठी फासावर चढलेल्या भगतसिंग यांना तो सन्मान देऊ नका.’