राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकी अगोदर काँग्रेस व राष्ट्रावादीतील दिग्गज नेत्यांचे पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचे सत्र जोरदार सुरू आहे. आज (मंगळवार) दुपारीच काँग्रेसमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रवेश केलेल्या व उत्तर मुंबई मतदारसंघातून पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवलेल्या उर्मिला मातोंडकर यांनी पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला असताना आता, काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांनी देखील काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. तसेच, उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कृपाशंकर सिंह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित आहे.

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्यापाठोपाठ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांनीही काँग्रेसचा राजीनामा दिला असल्याने आता काँग्रेसला हा तिसरा धक्का बसला आहे.

विशेष म्हणजे मागील आठवड्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कृपाशंकर सिंह यांच्या घरी बसवण्यात आलेल्या गणपतीच्या दर्शनासाठी गेले होते. दोन्ही नेत्यांच्या भेटीचा फोटो समोर आल्यानंतर कृपाशंकर सिंह यांच्या भाजपा प्रवेशाबाबत चर्चा देखील सुरू झाल्या होत्या. महाराष्ट्रातील उत्तर भारतीय नागिराकांच्या बड्या नेत्यांमध्ये कृपाशंकर सिंह यांचे देखील नाव घेतले जाते. काँग्रेसच्या सत्ताकाळात २००४ मध्ये ते राज्यमंत्री होते.

जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटवण्यात आल्यानंतर  काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेशी कृपाशंकर सिंह असहमत होते. त्यांनी यावरून नाराजी व्यक्त करत महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांची कर्नाटक भवनमध्ये भेटही घेतली  होती.