मुंबई : करोना प्रतिबंधक मोफत लसीकरण आणि लशींच्या वापरावरून काँग्रेसने भाजपला लक्ष्य केले. मोफत लसीकरणाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आश्वासनाचे काय झाले, असा प्रश्न प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे. तर, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्रात लशींच्या वापरात अपव्यय झाल्याचा खोटा प्रचार केल्याची टीका प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

देशात १८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांचे लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला.  केंद्र सरकारने ही जबाबदारी घ्यावी, अशी राज्य सरकारची मागणी होती. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी २८ एप्रिलला देशातील प्रत्येक पात्र नागरिकाला मोफत लस दिली जाईल, त्याचा भार राज्य सरकारांवर पडणार नाही, अशी ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात दिल्याचे म्हटले होते. प्रत्यक्षात मात्र लसीकरणाचा मोठा भार राज्य सरकारवर टाकला जात आहे. मग मोफत लसीकरणाच्या आश्वासनाचे काय झाले, याचे उत्तर फडणवीस यांनी  द्यावे, अशी मागणी मोहन जोशी यांनी केली आहे.