कोकणातील पर्यावरणाबाबत कोणी काहीही म्हणत असले तरी तेथील विकासाच्या आड कोणाला येऊ देणार नाही. डॉ. कस्तुरीरंगन समितीच्या शिफारशींची  अंमलबजावणी करण्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना कोकणात पाय ठेवू देणार नाही, असा थेट इशारा देत उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीतच रुद्रावतार धारण केला. प्रसंगी मंत्रिपदाचा राजीमाना देऊन रस्तावर उतरू असेही सुनावणाऱ्या राणे यांच्या या अवतारामुळे सारे मंत्रिमंडळ काही काळ अक्षरश स्थब्ध झाल्याचे समजते.
कस्तुरीरंगन समितीच्या शिफारसीनुसार  रत्नागिरी जिल्ह्यातील १९२ तर सिंधुदुर्ग जिल्ह्यतील १९५ गावांना केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने पर्यावरणदृष्टया संवेदनशील म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे या गावांमध्ये खाणकाम, रेती उत्खनन तसेच पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्या उद्योगांना मनाई करण्यात आली आहे. या तरतुदींची
अमलबजावणी सुरूदेखील झाली असून वन विभागाचे अधिकारी दोन दिवसांपूर्वी कोकणात गेले असता गावकऱ्यांनी त्यांना विरोध केला. मंत्रिमंडळ बैठकीत पर्यावरणाच्या या मुद्यावर चर्चा सुरू होताच नारायण राणे यांचा पारा चढला आणि त्यांनी रुद्रावतार धारण केला.
कोकणात डॉ. माधवराव गाडगीळ आणि डॉ. कस्तुरीरंगन समितीच्या शिफारशी लागू केल्यास मंत्रिमंडळाचा राजीनामा देऊन लोकांसाठी रस्त्यावर उतरू, मात्र कोणत्याही परिस्थितीत या नियमांची अंमलबजावणी होऊ देणार नाही, कोणी काहीही म्हटले तरी चालेल, त्याची मला पर्वा नाही, पण या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यास कोकणात पाय ठेवू देणार नाही. त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तरी मी जुमानत नाही, पालकमंत्री असतानाही आपल्याला कल्पना न देता तुमचे अधिकारी जातातच कसे असा सावलही त्यांनी यावेळी वनविभागाच्या सचिवांना केल्याचे कळते.
  कोकणातील गावांना पर्यावरणदृष्टय़ा संवेदनशील जाहीर केल्यानंतर राणे यांनी मंत्रिमंडळात यापूर्वीही आपली नाराजी व्यक्त केली होती. वन विभागाचे सचिव प्रविण परदेशी यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. मात्र, राणे काहीही ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हते. या निर्णयामुळे कोकणात विकास कामांसाठी वाळू मिळत नाही. घरे दुरुस्त करायलाही परवानगी नाही, दैनंदीन कामाला लाकूड मिळणार नाही. झाडाचा पालासुध्दा तोडता येणार नसेल तर कोकणातील माणसांनी तेथे रहावे की नाही,  कोकणाचा विकास कसा करायचा असा सावलही त्यांनी केला, आणि बैठकीतील चर्चेवर राणे यांच्या संतापाचे सावट पडले. काही काळ बैठकीचे कामकाजच थंडावले.

नीतेश राणे यांच्यासह तिघांना जामीन मंजूर
 पणजी : पेडणे येथील टोलनाक्यावर मंगळवारी सायंकाळी हल्ला करून तेथील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव नीतेश राणे आणि त्यांच्या तिघा समर्थकांना बुधवारी जामिनावर सोडण्यात आले. म्हापसा येथील प्रथम वर्ग दंडाधिकाऱ्यांनी जामीन मंजूर केला. नीतेश यांना याप्रकरणी मंगळवारी पेडणे येथील पोलिसांनी अटक केली होती. पेडण्याच्या टोलनाक्यावर टोल भरण्यास त्यांनी नकार दिल्यानंतर तेथे तणाव निर्माण झाला होता. गोव्यात नोंदणी न झालेल्या वाहनांकडून या नाक्यावर टोल वसूल करण्यात येतो. मात्र नीतेश राणे व त्यांच्या समर्थकांनी त्यास नकार देत टोलनाक्याची नासधूस केली व तेथे काम करीत असलेल्या गोवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तीन कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची तक्रार करण्यात आली होती.