काँग्रेसच्या आमदार निर्मला गावित आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रश्मी बागल यांनी बुधवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरेंचे निवासस्थान मातोश्रीवर हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या आमदार निर्मला गावित यांनी नुकताच विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला होता. त्यानंतर काल (मंगळवारी) दुपारी कार्यकर्त्यांसह त्यांचा शिवसेनेत प्रवेश होणार होता. मात्र, शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांच्या पत्नीचे निधन झाल्याने मातोश्रीवर होणारा हा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. दरम्यान, आज गावित यांचा शिवसेना प्रवेश झाला.

त्याचबरोबर, गेल्या १३ वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेससोबत असलेल्या रश्मी बागल यांनीही आज राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान, कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या आग्रहास्तव आपण जाहिरित्या शिवसेनेत प्रवेश केल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच शरद पवारांचे बोट धरुन आपण राजकारणात आलो होतो, त्यामुळे त्यांच्याशी आपले नेता आणि कार्यककर्त्याच्यापलिकडे आपुलकीचे नाते कायम राहिल असे त्यांनी म्हटले आहे.