देशाची अर्थव्यवस्था बिघडली आहे. तसंच अर्थव्यवस्था सावरण्यासाठी सरकारकडून कोणत्याही उपययोजना होताना दिसत नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. अशातच काँग्रेसचे नेचे सचिन सावंत यांनी एक ट्विट केलं आहे. देशाची अर्थव्यवस्था ‘मोदी’त निघाली असल्याची टीका त्यांनी केली आहे.

यापूर्वी शिवसेनेनंही अर्थव्यवस्थेतील मंदीवरून केंद्र सरकारवर टीका केली होती. भारतीय अर्थव्यवस्थेची घडी अद्यापही सुरळीत झालेली नाही. गेल्या चार दशकात पहिल्यांदाच नागरिकांचा उपभोग खर्च कमी झाल्याचा एका अहवालातून पुढे आलं आहे. भारतीय अर्थव्यवस्थेची झालेली घसरगुंडी आणि घटलेला बेरोजगार यावरून शिवसेनेनं मोदी सरकारवर प्रश्नांचा भडिमार केला होता. “‘रोजगार मेला आहे’ असा आक्रोश सरकारी आणि खासगी संस्थांचे आकडे करीत आहेत. ‘हाताची घडी आणि तोंडावर बोट’ ठेवून बसलेले आता तरी हे दाहक वास्तव मान्य करणार आहेत का?,” असा सवाल शिवसेनेनं केला होता.

देशाची अर्थव्यवस्था चिंताजनक स्थितीत आहे. मागील तिमाहीतील विकासदर (जीडीपी) ५ टक्क्यांवर आला आहे. हे आपण मंदीकडे जात असल्याचे निदर्शक आहेत. विकास करण्याची प्रचंड क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेत असताना मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे हे आर्थिक आरिष्ट ओढवले आहे, असे मत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी व्यक्त केले होते. देशातील तरुण, शेतकरी, शेतमजूर, उद्योजक आणि उपेक्षित प्रवर्ग चांगल्या जीवनमानासाठी पात्र आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेला लागलेली घसरण परवडणारी नाही. भारतीय अर्थव्यवस्थेवर ओढवलेल्या मानव निर्मित संकटातून बाहेर पडण्यासाठी राजकीय द्वेष बाजूला ठेवा आणि विचार करणाऱ्या, विवेकी माणसांपर्यंत सरकारने जावे अशी माझी सरकारला विनंती आहे, असंही ते म्हणाले होते.