टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा आता अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपली असतानाही स्पर्धेवरील करोनाचे सावट वाढतच आहे. दक्षिण आफ्रिका फुटबॉल संघातील दोन खेळाडू आणि चित्रफीत विश्लेषक यांना रविवारी करोनाची लागण झाली असून यामुळे संपूर्ण संघाला सक्तीच्या विलगीकरणात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनीही या स्पर्धेच्या आयोजनाबाबत भीती व्यक्त करत एक ट्वीट केले.

काय म्हणाले निरुपम?

निरुपम आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, ”जपानच्या ऑलिम्पिक गावाच करोनाचे सावट आहे. बरेच खेळाडू, प्रशिक्षक आणि तयारीमध्ये गुंतलेले लोक करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांना आयसोलेट केले जात आहे तरीही, क्रीडा क्षेत्रातील हा महाकुंभ करोनासाठी ‘सुपर स्प्रेडर’ ठरू शकेल, अशी भीती आहे. या स्पर्धेचे आयोजन झाले नाही, तर आपल्यावर कोणता डोंगर कोसळणार आहे?”

 

शुक्रवारपासून ऑलिम्पिकला प्रारंभ होणार असून आफ्रिकेचा संघ सध्या ऑलिम्पिकनगरीमध्ये वास्तव्यास आहे. शनिवारी ऑलिम्पिकनगरीत करोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. परंतु रविवारी ऑलिम्पिकनगरीतील खेळाडूंनाच करोना झाल्यामुळे येथील आरोग्य सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा – “द्रविड कोच असता तर करण जोहरची ‘ते’ करायची हिंमत झाली नसती”

‘‘थाबिसो मोनयेन आणि कामोहेलो माहलाट्सी या दोन खेळाडूंसह संघाचे चित्रफीत विश्लेषक मारिओ माशा यांना करोनाची लागण झाली आहे. यामुळे संपूर्ण संघ सध्या विलगीकरणात असून सोमवारी होणाऱ्या पहिल्या सराव सत्राला आम्हाला मुकावे लागेल,’’ असे आफ्रिका फुटबॉल संघाचे व्यवस्थापक मॅक्सोली सिबम यांनी सांगितले. त्याशिवाय माहलाट्सी याची प्रकृती अन्य दोघांच्या तुलनेत अधिक गंभीर असल्याची माहिती सिबम यांनी दिली.

गेल्या वर्षी होणार होत्या ऑलिम्पिक स्पर्धा

टोकियो ऑलिम्पिक २०२० स्पर्धा करोनामुळे गेल्या वर्षी पुढे ढकलण्यात आली होती. यंदा ऑलिम्पिक स्पर्धा होत असून, करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदाऱ्या घेण्यात आलेल्या आहेत. २३ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा चालणार असून, करोनाने ऑलिम्पिक स्पर्धेच्या दारावर थाप दिली आहे.