पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक (पीएमसी) प्रकरणी आज  राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. यावेळी राज्यपालांना निवेदन सादर करण्यात आले. या शिष्टमंडळात काँग्रेस नेते भाई जगताप यांचा सहभाग होता.

तत्पूर्वा आज पीएमसी बँक प्रकरणी सुनावणी पुढे ढकल्याने खातेदारांनी न्यायालयाबाहेर घोषणाबाजी केली होती. यावेळी संतप्त खातेदारांनी ‘आरबीआय चोर है’ अशा घोषणा देखील दिल्या होत्या. आज सुनावणी असल्याने मुंबई उच्च न्यायालयाबाहेर पीएमसीच्या खातेदारांनी मोठ्याप्रमाणावर गर्दी केली होती. या सुनावणीत काय होणार? याकडे खातेदारांचं लक्ष लागलं होतं. दरम्यान ही सुनावणी ४ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे आरबीआय विरोधात खातेदारांनी जोरदार घोषणाबाजी केली.

पीएमसी बँकेच्या घोटाळ्यानंतर आरबीआयने खातेदारांना त्यांच्याच खात्यातून पैसे काढण्यासंदर्भात निर्बंध घातले होते. त्यामुळे खातेदारांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. पीएमसी बँकेतील खातेदारांना तातडीने पैसे मिळावेत आणि त्यांना त्यांचे लॉकर हाताळता यावेत यासाठी एक नियमावली करण्यात यावी अशी विनंती, शिवसेनेकडून करण्यात आली होती. त्यावर उच्च न्यायालयात सुनावणी झाली होती.

या सगळ्या प्रकरणात मार्ग काढण्यासाठी पुढची दिशा काय असेल याची माहिती १३ नोव्हेंबर पर्यंत न्यायालयात सादर करावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आरबीआयला दिला होता. त्यासंबंधीची पुढील सुनावणी १९ नोव्हेंबर रोजी होईल असे या आदेशात नमूद करण्यात आले होते.