आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दलितांची मते मिळविण्यासाठी काँग्रेसकडून भरिप-बहुजन महसंघाबरोबरच आता मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाशीही (बसप) युती करता येऊ शकते का, याची चाचपणी सुरू आहे.  राज्यात बसपचा फायदा होईल की नाही, याबाबतही काँग्रेसमध्ये मतभिन्नता आहे.
दलित, आदिवासी व मुस्लिम समाज ही काँग्रेसची मतपेढी मानली जाते. परंतु या वेळी रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई असा कोणताही रिपब्लिकन गट काँग्रेससोबत नाही. त्यामुळे दलितांची मते कशी मिळवायची हा राज्यात काँग्रेसपुढे प्रश्न आहे. अलीकडेच भारिप व काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांची बैठक झाल्याचे समजते. भारिप-बहुजन महासंघाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र लोकशाही आघाडीची स्थापना झाली आहे. त्यामुळे काँग्रेसला आता आघाडीशी चर्चा करावी लागेल, अशी भारिपच्या नेत्यांची भूमिका आहे. लोकसभेच्या किमान चार ते पाच जागा मिळाव्यात असा आघाडीच्या वतीने भारिपने आग्रह धरला असल्याचे कळते. त्यामुळे काँग्रेसही संभ्रमात पडल्याचे सांगितले जाते.   काँग्रेसने महाराष्ट्रात बसपशी युती करता येईल का याचीही चाचपणी सुरू केली आहे. प्रत्येक मतदारसंघात किमान सहा ते आठ हजारापर्यंत त्यांचे मतदार आहेत. त्याचा फायदा काँगेसला मिळेल. युती करण्याचा निर्णय दिल्लीतच होईल, असे एका काँग्रेस नेत्याने सांगितले.