पालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या टॅब खरेदीत झालेल्या घोटाळ्याबाबत तक्रार करूनही पालिका आयुक्तांनी त्याची दखल न घेतल्याने अखेर काँग्रेसने मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली आहे. टॅब खरेदीचे कंत्राट तात्काळ रद्द करून या प्रकरणाची र्सवकष चौकशी करावी आणि दोषींविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. पालिका शाळांमधील इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना टॅब देण्यासाठी प्रशासनाने निविदा मागविल्या होत्या. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर व्हिडीओकॉन कंपनीची संलग्न टेक्नो इलेक्ट्रॉनिक्स कंपनीला हे कंत्राट देण्यात आले. बाजारात कमी दरात टॅब उपलब्ध असताना या कंपनीकडून चढय़ा भावात ते खरेदी करण्यात येत आहेत, असा आक्षेप घेत काँग्रेसने पालिका आयुक्त अजय मेहता यांच्याकडे या संदर्भात तक्रार केली होती. मात्र अद्यापही या तक्रारीची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून या प्रकरणाची मागणी करण्यात आली आहे.