गेल्या काही दिवसांपासून राज्यात धार्मिक स्थळं लोकांसाठी खुली करण्यात यावीत यासाठी विरोधी पक्ष महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपाच्या या मागणीला गेल्या काही दिवसांपासून मनसे, विहींप यांनीही आपला पाठींबा दर्शवला आहे. मनसे आणि विहींपने धार्मिक स्थळं उघडण्यासाठी मोर्चाचं आयोजन केलं होतं. विरोधी पक्षांच्या या मागणीला काँग्रेसचे आमदार आणि महाविकास आघाडीतील मंत्री अस्लम शेख यांनी उत्तर दिलं आहे. करोनाच संकट अजून संपलेलं नाही. एकीकडे रुग्णसंख्येत वाढ होत असताना लोकांचा जीव वाचवणं महत्वाचं की धार्मिक स्थळं उघडणं महत्वाचं?? धार्मिक स्थळांसाठी मोर्चा काढण्याऐवजी विहींपने प्लाझ्मा दानासाठी आवाहन करावं असं अस्लम शेख म्हणाले आहेत.

“आजच्या घडीला धार्मिक स्थळं उघडणं हा लोकांच्या जीव वाचवण्यापेक्षा महत्वाचा मुद्दा आहे का?? असं असेल तर केंद्र सरकारने एवढ्या दिवसांमध्ये सर्व राज्यांसाठी एक आदर्श कार्यप्रणाली जाहीर करायला हवी होती. धार्मिक स्थळं उघडण्यासाठी रस्त्यावर येण्याऐवजी प्लाझ्मा दानासाठी विंहीपने आवाहन केलं तर ते जनतेच्या अधिक फायद्याचं ठरेल. सीमेवर चीनची वाढणारी दादागिरी, घसरणारा जीडीपी, वाढती बेरोजगारी यासारख्या मुद्द्यांवर मौन बाळगायचं आणि विहींपसारख्या संघटनांना पुढे करुन आपला राजकीय अजेंडा राबवायचा यावरुन भाजपाचे नेते किती खालच्या स्तराचं राजकारण करत आहेत हे पहायला मिळतं.” शेख यांनी महाविकास आघाडी सरकारीच भूमिका मांडली.

विहींपसारख्या संघटनांना पुढे करुन महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी हा डाव आखला जात असल्याचंही अस्लम शेख म्हणाले. काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेले अस्लम शेख हे मुंबईचे पालकमंत्री असून त्यांच्याकडे वस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय आणि बंदरे अशा खात्यांचा पदभार आहे.