बाळासाहेब थोरात यांचा आरोप

राज्यात सरकार स्थापन करण्यात अपयशी ठरू लागलेल्या भाजपने आता पुन्हा साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर करून काँग्रेसच्या काही आमदारांना आर्थिक आमिषे दाखवून आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न चालवला आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केला. भाजपच्या या कृतीचा आपण निषेध करतो, असे ते म्हणाले.

राज्यात सध्या भाजप आणि शिवसेना यांच्यात सत्तासंघर्ष सुरू आहे. निकाल लागून दोन आठवडे उलटले तरी सरकार स्थापन होत नाही. राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. या सर्व परिस्थितीवर काँग्रेस लक्ष ठेवून आहे, मात्र सध्या तरी फक्त ‘थांबा आणि पहा’ अशी पक्षाची भूमिका आहे, असे थोरात यांनी सांगितले.

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्यास बाहेरून पाठिंबा द्यावा, असा काँग्रेसमध्ये एक मतप्रवाह आहे. या मुद्दय़ावर तरुण आमदार आक्रमक असून, राज्यात बिगरभाजप सरकार येण्याकरिता नवीन राजकीय समीकरणे जुळविण्यासाठी पक्षनेतृत्वावर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही आमदार गुरुवारी त्यासाठी दिल्लीला वरिष्ठ नेत्यांना भेटण्यासाठी गेल्याचे सांगण्यात आले. त्याला थोरात यांनीही दुजोरा दिलाच; परंतु पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील, तोच सर्वाना बंधनकारक राहणार आहे, याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

भाजप आणि शिवसेना यांच्यात गुरुवारी दिवसभर खडाखडी सुरू असताना, काँग्रेस नेत्यांमध्ये पुन्हा खलबते सुरू झाली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी सायंकाळी प्रदेशाध्यक्ष थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि इतर नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना थोरात म्हणाले की, आज निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीला भाजप जबाबदार आहे. मित्रपक्षांना सांभाळले नाही, दिलेला शब्द पाळला नाही. अर्थात भाजप आणि शिवसेना या दोघांमधील हा प्रश्न असला तरी महाराष्ट्र अडचणीत आला आहे.

विधानसभा निवडणुकीपासूनच भाजपने साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर केला आहे. आता शिवसेना सोबत येत नसल्याने सरकार स्थापन करणे अवघड झाले आहे. त्यामुळे भाजपने विरोधी पक्षातील आमदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी आर्थिक आमिषे दाखवायला सुरुवात केली आहे. भाजपच्या काही नेत्यांनी काँग्रेसच्या काही आमदारांशी संपर्क सुरू केला आहे, त्यापैकी चार आमदारांनी दूरध्वनी करून ही माहिती आपल्याला दिल्याचे थोरात यांनी सांगितले. भाजपच्या या कृतीचा आपण निषेध करतो, असे ते म्हणाले. काही झाले तरी भाजपच्या या साम, दाम, दंड, भेद नीतीला यश येणार नाही, काँग्रेसचा एकही आमदार त्यांच्या गळाला लागणार नाही, असा दावा त्यांनी केला.

भाजपच्या काही नेत्यांनी काँग्रेसच्या काही आमदारांशी संपर्क साधला. त्यापैकी चार आमदारांनी दूरध्वनी करून आपल्याला या प्रकाराची माहिती दिली.

– बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस