काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला पक्षाच्या आमदारांचा विरोध असल्याने, येत्या गुरुवारी होणाऱ्या निवडीच्या वेळी कोणाची वर्णी लागते याबाबत उत्सुकता आहे.
पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना पक्षाच्या आमदारांमध्ये त्यांच्याबद्दल फार काही आपुलकीची भावना नव्हती. मतदारसंघांतील कामे होत नसल्याने आमदारमंडळी नेहमीच चव्हाण यांच्या विरोधात बोलायचे. पराभवाचे खापर पक्षाकडून चव्हाण यांच्यावर फोडण्यात येत असताना आता पुन्हा चव्हाण यांचीच निवड करण्यास पक्षाच्या आमदारांचा विरोध आहे. अन्य कोणाचीही निवड करा, पण पृथ्वीराज नको, अशी भावना आमदारांची आहे. पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव दिल्लीतून रेटण्याचा प्रयत्न झाला तरी विरोध करू, असेही आमदारांकडून सांगण्यात येते.
नागपूर जिल्ह्यातील सावनेर मतदारसंघातून निवडून आलेल्या सुनील केदार यांनी चव्हाण यांच्या विरोधात उघडपणे भूमिका घेतली आहे. राधाकृष्ण विखे-पाटील, बाळासाहेब थोरात, डॉ. पतंगराव कदम आदींची नावे गटनेतेपदासाठी चर्चेत आहेत.