मुंबईतील काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांना मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने असभ्य मेसेज पाठवल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वर्षा गायकवाड यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून या घटनेचा सायबर गुन्हे शाखेने तपास सुरु केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून महिला नेत्यांना अश्लील मेसेज पाठवण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. सोमवारी रात्री उशीरा काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांनी वडाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. वर्षा गायकवड यांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने असभ्य भाषेतील मेसेज पाठवले होते. शेवटी या प्रकरणी वर्षा गायकवाड यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. ‘महिला नेत्यांना असभ्य भाषेत मेसेज पाठवण्याचे प्रकार वाढले आहे. पुरुषांचे वर्चस्व असलेल्या क्षेत्रात पुढे येणा-या महिलांना टार्गेट केले जाते. जर महिला नेत्यांनाच यामुळे त्रास सहन करत लागत असेल तर सर्वसामान्य महिलांची काय अवस्था असेल असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. विधीमंडळाच्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या आठवड्यात शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या मोबाईलवरही धमकीचे मेसेज आले होते. गोऱ्हे यांना मेसेजद्वारे बलात्कार करुन ठार मारण्याची धमकी दिली जात होती. याप्रकरणी गोऱ्हे यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी दिपककुमार प्यारेलाल गुप्ताला अटक केली आहे. तर भाजप नेत्या शायना एनसी यांनादेखील मोबाईलवर असभ्य भाषेत मेसेज आले होते. याप्रकरणी पोलिसांनी भाजपच्या एका कार्यकर्त्याला अटक केली होती.