केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात सूडाचे राजकारण करीत आहे, असा आरोप करीत शनिवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुंबईसह राज्यात काही ठिकाणी ‘रास्ता रोको’ आंदोलन केले.
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी वांद्रे येथील खेरवाडी जंक्शन येथे निदर्शने केली. यावेळी पोलिसांनी काँग्रेसच्या नेत्यांसह १०१ कार्यकर्त्यांना अटक केली आणि काही वेळाने त्यांना सोडून देण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, ज्येष्ठ नेते नारायण राणे, प्रिया दत्त, नसीम खान, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली वांद्रे-खेरवाडी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात काँग्रेस कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते, त्यामुळे काही वेळ वाहतुकीची कोंडी झाली. मोदी सरकार सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्याविरोधात सुडाचे राजकारण करीत आहे, असा आरोप चव्हाण, राणे व निरुपम यांनी या वेळी केला.
यवतमाळ येथेही काँग्रेस कार्यकर्त्यांनी सुमारे दीड तास रास्ता रोको आंदोलन करत आर्णी, दारव्हा, दिग्रस, पुसद, उमरखेड वर्धा आणि नागपूरकडे जाणारी वाहतूक ठप्प केली. या वेळी पोलिसांनी २०० कार्यकत्रे व नेत्यांना ताब्यात घेतले. चंद्रपूरमध्येही काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आणि रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
नागपूरमध्ये काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली देवडिया भवनासमोर निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकारचे सुडाचे राजकारण खपवून घेतले जाणार नाही, या विरोधात आंदोलन केले जाईल, असे ठाकरे म्हणाले. यावेळी सोनिया, राहुल यांच्या समर्थनार्थ व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.

‘नॅशनल हेराल्ड’ची सर्वसाधारण सभा जानेवारीत
काँग्रेसला अडचणीत आणणाऱ्या ‘नॅशनल हेराल्ड’ वृत्तपत्राची मालकी असणाऱ्या ‘द असोसिएटेड जर्नल्स’ कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा २१ जानेवारी रोजी होणार आहे. सध्या व्यावसायिक स्वरूप असणाऱ्या या कंपनीचे रूपांतर ‘विना नफा’ तत्त्वावरील कंपनीत करण्याबद्दल कंपनीच्या समभागधारकांची संमती मिळविण्याचा प्रयत्न या सभेत होणार आहे. या कंपनीला कंपनी कायद्यातील कलम ८ नुसार ‘विना नफा’ तत्त्वावरील कंपनीचा दर्जा देण्यासाठी समभागधारकांची परवानगी घेण्यात येईल.

घटनाक्रम..
’ सोनिया व राहुल यांचे दुपारी पावणेतीनच्या सुमारास न्यायालयात आगमन
काँग्रेस कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी
’अभिषेक मनु सिंघवी व कपिल सिबल यांचा गांधीद्वयातर्फे न्यायालयात युक्तिवाद
’ न्यायालयाबाहेर प्रचंड गर्दी; सोनिया व राहुलना अटक झाल्याचीही अफवा
’ दहा मिनिटांत गांधी माता-पुत्राला जामीन मंजूर
’ न्यायालयातून दोघांसह अनेक नेते पक्ष कार्यालयाकडे रवाना
’पत्रकार परिषदेत केंद्र सरकारवर राहुल यांची सडकून टीका

‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणात स्वामी यांनी आपणहून तक्रार दाखल केली आहे. त्याच्याशी केंद्र सरकार अथवा भाजपचा संबंध जोडू नये. उलट, या प्रकरणाकडे लक्ष जाऊ नये, म्हणून काँग्रेस संसदेत पंतप्रधान, अर्थमंत्री आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांविरोधात निराधार आरोप करत आहे.
– व्यंकय्या नायडू, संसदीय कामकाजमंत्री