कोळसा घोटाळ्यातील संशयित
द्वितीय वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात भ्रष्टाचारमुक्तीबद्दल स्वतची पाठ थोपटून घेतली असतानाच कोळसा घोटाळ्यातील संशयित काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार विजय दर्डा यांनी आता भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवारी मिळवण्याचे जोरदार प्रयत्न चालवले आहेत. त्यासाठी दर्डा यांनी रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपुरात भेटही घेतली. मात्र, घोटाळ्याची पाश्र्वभूमी असल्याने भाजपतर्फे दर्डा यांचा राज्यसभेसाठी विचार केला जाण्याची शक्यता फारच कमी असल्याचे पक्षाच्या गोटात बोलले जात आहे. भाजपने राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी कोल्हापूरचे छत्रपती श्रीमंत शाहू महाराज यांच्या नावाचा विचार सुरू केल्याचे समजते.
विजय दर्डा यांना काँग्रेसने पुन्हा उमेदवारी नाकारल्याने त्यांनी रविवारी नागपुरात गडकरी यांची भेट घेतली. सुमारे तासभर चाललेल्या या भेटीत दर्डा यांनी गडकरींकडे भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवारी मिळावी याबाबत चर्चा केल्याचे समजते. दोनदा काँग्रेसकडून आणि एकदा अपक्ष उमेदवार म्हणून राज्यसभेचे सदस्य राहिलेल्या दर्डा यांचे २०१२ मध्ये कोळसा खाणवाटप घोटाळ्यात नाव आले आहे. दर्डा यांनी जुलै, २०१२ मध्ये अहमदाबादेत झालेल्या कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळून पक्षश्रेष्ठींची नाराजी ओढवून घेतली होती. या सर्व पाश्र्वभूमीवर दर्डा यांना काँग्रेसकडून पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता धुसरच होती. परंतु मोदी यांच्या भ्रष्टाचारमुक्त सरकार या धोरणाच्या पाश्र्वभूमीवर दर्डा यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमीच असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
विधान परिषदेसाठी ठाकूर
राज्यसभेसाठी पीयूष गोयल आणि विधान परिषदेकरिता सुरजित ठाकूर या दोघांची उमेदवारी भाजपने जाहीर केली आहे. मित्र पक्षांना किती जागा सोडायच्या आणि पक्षातील इच्छुकांची संख्या लक्षात घेता उमेदवारांची संपूर्ण यादी जाहीर करण्याचे टाळण्यात आले आहे. राज्य सरचिटणीस मराठवाडय़ातील सुरजित ठाकूर पूर्वी गोपीनाथ मुंडे यांचे खास निकटवर्तीय मानले जात. मुंडे यांच्या निधनानंतर त्यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी जमवून घेतले. पक्षाच्या चार उमेदवारांची नावे उद्याच जाहीर केली जातील. मित्रपक्षांसाठी किती जागा सोडायच्या याचाही भाजपमध्ये घोळ आहे. यामुळेच नावे जाहीर करण्यास विलंब लागत आहे. विनायक मेटे व स्वाभिमानी शेतकरी संघटना आमदारकीसाठी आग्रही आहेत. सर्व मित्रपक्षांचे समाधान करायचे झाल्यास स्वपक्षीयांना सामावून घेणे भाजपला शक्य होणार नाही. राज्यसभेवर भाजपचे तीन उमेदवार निवडून येऊ शकतात. यापैकी पीयूष गोयल यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. रामदास आठवले यांना केंद्रात मंत्रिपद दिल्याशिवाय रिपब्लिकन पक्ष राज्य मंत्रिमंडळात मंत्रिपद तसेच विधान परिषदेची आमदारकी स्वीकारणार नाही, असा पवित्रा रिपब्लिकन पक्षाने घेतला आहे. तर आठवले यांनी राज्यात मंत्रिपद स्वीकारावे ही भाजपची भूमिका ठाम आहे.

राज्यसभेसाठी भाजपतर्फे पाच केंद्रीय मंत्र्यांची नावे रविवारी जाहीर करण्यात आली असली तरी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या नावाची घोषणा झाली नाही. यामुळेच प्रभू यांची गाडी का रखडली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सुरेश प्रभू हे पंतप्रधानांच्या विश्वासातील असल्याने त्यांना महाराष्ट्र किंवा हरयाणा यापैकी एका राज्यातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

भाजपकडून राज्यसभेवर जाण्यास मी इच्छुक आहे. मात्र, याबाबतचा निर्णय भाजपने घ्यायचा आहे. नितीन गडकरी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो. त्यांच्या व माझ्या मित्रत्वाची कल्पना काँग्रेस पक्षश्रेष्ठींना आहे. पक्षाने उमेदवारी नाकारली तरी मी नाराज नाही.
-विजय दर्डा,
सदस्य, राज्यसभा