काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मोदींबाबत त्यांनी अशिक्षित, अडाणी अशा शब्दांचा वापर करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. देशाचे दुर्भाग्य आहे की, आपल्या पंतप्रधानांच्या पदवीबाबत देशातील जनता आणि युवकांना काहीच माहिती नाही. पंतप्रधान मोदींवर काढण्यात आलेला चित्रपट मुलांना दाखवण्याचा प्रयत्न केला जात असून हे अत्यंत चुकीचे आहे. मुलांना राजकारणापासून दूर ठेवले पाहिजे, असे मत निरूपम यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी निरूपम यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. सभ्य माणसाला न शोभणारे हे वक्तव्य असल्याची टीका त्यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील मंगेश हडवळे दिग्दर्शित ‘चलो जीते हैं’ हा लघुपट दाखवण्याचा नवा आदेश महाराष्ट्रातील शाळांसाठी काढण्यात आला आहे. हा लघुपट विद्यार्थ्यांना दाखवण्यास काही राज्यांनी नकार दिल्यानंतर वादंग उसळला होता. यावरून राज्य सरकारवर मोठ्याप्रमाणात टीका होताना ही दिसते.

मोदींवरील लघुपट शाळांमध्ये दाखवण्याचा फतवा

जी मुलं शाळा, महाविद्यालयात शिकत आहेत. त्यांना मोदींसारख्या अशिक्षित, अडाणी व्यक्तीबाबत जाणून घेऊन काय मिळणार आहे ? ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे. आजही आमच्या देशातील नागरिक आणि मुलांना आमच्या पंतप्रधानांची पदवीच माहीत नाही, असे वक्तव्य संजय निरूपम यांनी केले.

निरूपम यांच्या वक्तव्याचा शेलार यांनी समाचार घेतला. सभ्य माणसाला न शोभणारं वक्तव्य निरूपम यांनी केले आहे. मी त्यांचा निषेध करतो. काँग्रेसला हे शोभा देत नाही आणि निरूपम यांनी प्रेरणेविषयी बोलू नये, असा टोलाही त्यांनी लगावला.