राज्यात गेल्या काही दिवसांपासून आगीच्या अनेक घटना समोर येत आहेत. भांडूप येथे ड्रीम्स मॉल सनराईज येथे लागलेली भीषण आग तब्बल ३० तासानंतर आटोक्यात आली आहे. या आगीत १२ करोना रुग्णांना आपली जीव गमवावा लागला आहे. त्यातच सकाळी प्रभादेवी येथे एका इमारतीला आग लागली होती. तर दुसरीकडे पुण्यात रात्री फॅशन स्ट्रीट मार्केटला लागलेल्या भीषण आगीत ४५० दुकानं खाक झाली. यादरम्यान मुंबईत परेलमध्ये रात्री एका इमारतीला आग लागली होती. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले स्वत: तिथे उपस्थित होते.

नाना पटोले शुक्रवारी भिवंडी दौऱ्यावर होते. दौऱ्यावरुन परतत असताना रात्री त्यांना परेल येथे एका इमारतीला आग लागल्याचं दिसलं. यावेळी त्यांना तिथेच ताफा थांबवला आणि आग आटोक्यात येत नाही तोपर्यंत तिथेच थांबून राहिले होते. नाना पटोले यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेचं तिथे उपस्थित असणाऱ्यांनीही कौतुक केलं.

नाना पटोले यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. ट्विटमध्ये त्यांनी सांगितलं आहे की, “काल रात्री भिवंडी जनसंपर्क दौरा आटोपून रात्री १:४० वाजता परत येत असताना परेल येथील एका इमारतीला आग लागलेली बघुन तत्काळ ताफा थांबविला. लगेच पोलीस प्रशासन व फायर ब्रिगेडला तात्काळ सूचना देऊन आग आटोक्यात येईपर्यंत थांबून राहीलो. यामुळे मोठा अनर्थ व जिवितहानी टळली”.

भांडुपच्या आगीत १२ करोना रुग्णांचा मृत्यू
भांडुप पश्चिमेकडील एल.बी.एस. मार्गावरील ‘ड्रीम्स मॉल’मध्ये गुरुवारी मध्यरात्री आग लागल्याने तेथील करोना रुग्णालयातील १२ रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.

अग्निप्रतिबंधक अटींची पूर्तता न करताच मॉलमध्ये हे रुग्णालय उभारण्यात आले होते. या दुर्घटनेमुळे रुग्णालय आणि मॉलमधील अग्निसुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या मॉलमध्ये रुग्णालय उभारण्यास परवानगी कशी दिली यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून महापौरांनी दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

पुण्याच फॅशन स्ट्रीट मार्केटची राखरांगोळी; ४४८ दुकानांचा कोळसा
पुण्यात महात्मा गांधी रोडवर असलेल्या फॅशन स्ट्रीट मार्केटमध्ये रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आग लागली. आग लागल्यानंतर परिसरातील नागरिकांनी अग्निशमन दलाला याची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या ५० जवानांसह १६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, तोपर्यंत आगीने मार्केटमधील शेकडो दुकानं कवेत घेतली होती. आगीचे मोठं मोठे लोळ आकाशाच्या दिशेनं जाताना दिसत होते.

नायगाव पूर्वेतील चंडिका मातेच्या डोंगराला भीषण आग
नायगाव पूर्वेतील चंद्रपाडा येथील चंडिका मातेच्या डोंगराला भीषण आग लागल्याची घटना गुरुवारी घडली. गुरुवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती.