लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागावाटपाचे गाडे अडलेले असतानाच आता काँग्रेसला चर्चेसाठी मुहूर्त सापडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अन्य पक्षांशी घरोबा करण्याचे मनसुबे जाहीर करताच काँग्रेसने केवळ चर्चेची तयारीच नव्हे, तर जागावाटपाचा अंतिम निर्णयही १२ फेब्रुवारीपर्यंत होईल, असा आशावादही काँग्रेसने व्यक्त केला.
काँग्रसने २६ जागा लढविण्याचे ठरविले असून त्या मतदारसंघात प्रभारी नेत्यांची  व मंत्र्यांची नावे गुरूवारी जाहीर केली. त्यामुळे २६२२ चे सूत्र स्वीकारून काँग्रेसने पावले टाकण्यास सुरूवात केली आहे. मात्र जागावाटपाची चर्चा अजून पूर्ण व्हायची असून १०-१२ फेब्रुवारीपर्यंत निर्णय होईल. काही जागांची अदलाबदल होण्याची शक्यता असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंत्रिमंडळात बुधवारी अनेक निर्णय घेतल्याबद्दल ठाकरे यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना जागावाटपाचा अंतिम निर्णय झालेला नसल्याची माहिती त्यांनी दिली. जागावाटपाबाबत महाराष्ट्रातील नेत्यांशी चर्चा होईलच, केवळ दिल्लीत निर्णय होणार नाही. मात्र मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत जाऊन अंतिम निर्णय घेतल्यास त्यात वावगे काहीच नाही, असे ठाकरे यांनी सांगितले.
जागावाटपावरून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील तिढा अजून सुटलेला नाही. तरीही काँग्रेसने २६ मतदारसंघाच्या जबाबदाऱ्या आपल्या प्रमुख नेते व पदाधिकाऱ्यांवर सोपविल्या आहेत. म्हणजे जागावाटप व सूत्र ठरले आहे का, आदी प्रश्नांची  सरबत्ती पत्रकारांनी ठाकरे यांच्यावर केली. त्यावर गेल्यावेळी लढविलेल्या जागांनुसार या जबाबदाऱ्या संबंधितांवर देण्यात आल्या आहेत. चर्चेत अंतिम निर्णय झाल्यावर त्यानुसार या यादीत आवश्यक बदल केले जातील, असे ठाकरे यांनी नमूद केले.

जनतेची दिशाभूल करू नये
पवई परिसरात दुर्बल घटकांमधील नागरिकांसाठी ५४ हजार रुपयांमध्ये घरे उपलब्ध असल्याचे सांगून  अर्ज वाटण्यात आले. गेले दोन-तीन दिवस मंत्रालय परिसरात हजारो नागरिकांनी गर्दी केली आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. यासंदर्भात विचारता आंदोलनाचा हा प्रकार योग्य नाही. जनतेची दिशाभूल करू नये, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.