स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेत पाठवावयाच्या सदस्यांच्या जागेसाठी होणाऱ्या निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारासच मतदान करावे, असे पक्षादेश उभय पक्षांनी जारी केले आहेत.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण व राष्ष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जारी केलेल्या एका संयुक्त निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. मुंबई स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात अर्जुन ऊर्फ भाई जगताप, अहमदनगर मतदारसंघात अरुण जगताप, कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात सतेज ऊर्फ बंटी पाटील, सोलापूरमध्ये दीपक साळुंखे, धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात अमरीश पटेल, अकोला-वाशीम-बुलढाणा मतदारसंघात रवी सपकाळ हे काँग्रेस-राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार आहेत.
मुंबई स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात प्रसाद लाड तर अहमदनगर मतदारसंघात जयंत ससाणे यांचे उमेदवारी अर्ज विहित मुदतीत मागे घेता आले नाहीत. त्यामुळे हे दोघेही निवडणुकीच्या रिंगणात असतील. सदस्यांनी आघाडीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करावे, असा पक्षादेश असल्याचे संयुक्त निवेदनाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.